बल्लारपूर (चंद्रपूर) : अहमदाबाद येथून दाेन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून विजयवाडा जाणाऱ्या टाेळीतील दाेघांना रेल्वे पाेलिस दलाने अटक केली. ही कारवाई रविवारी रात्री नवजीवन एक्स्प्रेसमध्ये बल्लारशाह स्थानकावर करण्यात आली. आराेपींमध्ये मुंबई येथील पुरुषासाेबत नागपूर येथील महिलेचा समावेश आहे. रेल्वे चाइल्ड लाइनच्या सहकार्याने बाळाला किलबिल बालगृह चंद्रपूर येथे सुरक्षित ठेवले आहे.
चंद्रकांत मोहन पटेल (वय ४०, रा. इंदिरानगर, संगम सोसायटी, राणी सती मार्ग, मलाड मुंबई) व द्रौपदी राजा मेश्राम (४०, रा. आयबीएम रॉड, धम्मनगर गिट्टीखदान, काटोल रोड, नागपूर) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. सुरतकडून येणाऱ्या नवजीवन एक्स्प्रेस (१२६५५) मधील कोच नंबर ६ मध्ये एका जोडप्याजवळील बाळ जोरजोरात रडत असल्याची तक्रार येताच नागपूर रेल्वे पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांना कळविले. चंद्रपूर रेल्वेचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण महाजन, तसेच संजय शर्मा व आर. एल. सिंग यांनी चंद्रपूर स्थानकावर कोचमध्ये चढून शोध घेतला व शोध घेत बल्लारशाह स्थानकावर कोच क्रमांक ३ मधून दोन्ही आरोपींना लहान बाळासह उतरवून ताब्यात घेतले. रेल्वे स्थानकावरील रेल्वे चाइल्ड लाइनच्या पंचासमक्ष आरोपींनी बाळाला पळवून आणल्याचे कबूल केले. यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने आरोपींना जीआरपी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
आरोपी बनले बनावट पती-पत्नी
आराेपी चंद्रकांत आणि द्रौपदी यांनी रेल्वेत पती-पत्नी होण्याचे नाटक केले; परंतु रेल्वे पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर आरोपींनी ते पती-पत्नी नसून बाळाला पळवून आणल्याचे त्यांनी कबूल केले.
रॅकेट वेगळेच
यात पुरुष आरोपीने या कामाचे १० हजार व महिला आरोपीने पाच हजार रुपये घेतले असल्याचे सांगितले. या बाळाला विजयवाडा येथे पोहोचवून देण्यासाठी त्यांनी हे पैसे घेतले हाेते. त्यांच्या मोबाइलमध्ये विजयवाडा येथील युनूस व मुमताज यांच्याशी बाळाला विकण्याबाबत चर्चा झाली असल्याचे निष्पन्न झाले. लहान मुलांना पळवून नेणारे रॅकेट या घटनेमागे असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही आरोपींकडे अहमदाबाद ते विजयवाडाचे रेल्वेचे जनरल तिकीट होते.