सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : प्रस्तावाला शासनाची मान्यताचंद्रपूर : वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुक्यातील चारवट या गावाच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने रस्ते खडीकरण, नाली बांधकाम व विद्युत व्यवस्था या कामांसाठी दोन कोटी १८ लाख २७ हजार ८१७ इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकाला विशेष बाब या सदराखाली प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या महसुल व वनविभागाने ६ मार्च रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील चारवट हे गाव इरई नदीच्या काठावर वसलेले असुन सदर गाव अतिवृष्टी व पुराने वारंवार वेढले जाते. या गावाच्या पुर्न:वसन करण्याची मागणी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने शासनदरबारी रेटून धरली होती. त्यानुसार सन २००६ मध्ये या गावाच्या पुर्न:वसनासाठी शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. सदर पुर्न:वसीत गावामध्ये रस्त्याचे खडीकरण, नाली बांधकाम व विद्युत व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडून राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली असून विकासकामासाठी दोन कोटी १८ लाख २७ हजार ८१७ रूपयाच्या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चारवट येथील नागरिकांची प्रलंबित मागणी पुर्णत्वास आली आहेत.(नगर प्रतिनिधी)
पुनर्वसित गाव चारवटच्या विकासासाठी दोन कोटी मंजूर
By admin | Published: March 08, 2017 12:48 AM