विदर्भातील महावितरणच्या २२ लाख ग्राहकांकडे ९२३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनी टिकवायची असेल तर वीजबिल वसुलीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वीजबिल वसुलीत हयगय केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिला.
पाचही परिमंडळातील मुख्य अभियंते, अधीक्षक, कार्यकारी अभियंत्यांची बैठक पार पडली. या वेळी सर्व परिमंडळांचा आढावा घेण्यात आला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्वच वर्गवारीतील थकबाकी १०० टक्के वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुली व वीजहानी कमी करण्यासाठी नियोजनबद्धरीत्या काम करावे. त्यासाठी मीटर रीडिंग एजन्सीच्या नियमित बैठका घ्यावात. ० आणि १ ते ३० युनिट वीजवापर असणाऱ्या ग्राहकांची काटेकोर तपासणी करावी, तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांवर लक्ष ठेवून वीजचोरी आढळ्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. सार्वजनिक दिवाबत्ती व पाणीपुरवठा योजनेच्या चालू बिलाची थकबाकी वसुलीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी, कोणत्याही प्रवर्गातील ग्राहकांकडे थकबाकी असल्यास ती वसूल करावी, ग्राहक वीजबिलांचा भरणा करत नसेल तर त्याचा वीजपुरवठा खंडित करावा तसेच या कामांत हयगय करणाऱ्या अभियंता, तांत्रिक कर्मचारी व इतरही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले.