दरवर्षी हजारो क्विंटल कागद येणकेणप्रकारेन छपाईसाठी सर्वत्र वापरला जातो. अशाप्रकारे छापील कागदाचा ऱ्हास होतो; पण महावितरणद्वारा ‘गो-ग्रीन’ योजनेत छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे.
त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीज बिल ई-मेल, तसेच एसएमएसद्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह वीज बिल भरल्यास प्रॉम्ट पेमेंटचीही सूट मिळणार आहे.
ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. सोबतच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर वीज बिल मूळ स्वरूपात उपलब्ध असून, ते डाऊनलोड किंवा प्रिंट करता येते. महावितरण चंद्रपूर परिमंडळातील २ हजार २६५ ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्यावरणपूरक पर्याय निवडून पर्यावरणपूरक कामात योगदान दिले आहे.
हा पर्याय सर्वच ग्राहकांना उपलब्ध असून, गो ग्रीनच्या माध्यमातून प्रति वीज बिल १० रुपये वाचविण्यासोबतच कागदाचा वापर टाळून वसुंधरेच्या व पर्यावरणाच्या समृद्धीसाठी हातभार लावण्याचे महत्त्वाचे कार्य साधण्याची संधी आहे.
कोट
‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी वीज ग्राहकांनी बिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या लिंकवर उपलब्ध आहे. ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा लाभ घ्यावा व पर्यावरणपूरक योजनेमध्ये योगदान द्यावे.
-सुनील देशपांडे, मुख्य अभियंता महावितरण, चंद्रपूर परिमंडळ