लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कोठरी- गोंडपिपरी मार्गावरील जंगलातील कन्हारगाव तसेच त्या टापूतील २६५ चौरस किलोमीटर जंगलव्याप्त भागात अभयारण्य (वन्यप्राणी निवास व संगोपन) प्रकल्प होणार आहे. मात्र, या नियोजित प्रकल्पाला येथील स्थानिकांचा विरोध आहे. स्थानिकांनी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना या भागाला अभयारण्य करु नये, असे निवेदन दिले आहे. तसेच, या क्षेत्रात येणाऱ्या २० गावातील ग्रामपंचायतींनी ठराव करुन या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आता काँग्रेसही सरसावली आहे.या विषयावर पत्रपरिषद घेऊन काँग्रेसने या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले आहे. शासनाला विरोध म्हणून नव्हे तर जवळच ताडोबा अभयारण्य असल्याने या भागातील लोकांना बेरोजगार करणाºया या अभयारण्याची गरज नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे एकूण २० गावे उठणार आहेत. यामुळे हजारो लोकांना रोजगारापासून मुकावे लागणार आहे. सोबतच पूनर्वसनाचा प्रश्न उभा होईल. या भागातील गुजरान जंगलातील कामे व शेतीवर चालते. आदिवासींना त्यापासून मुकावे लागेल. अभयारण्य म्हणजे वाघ आलेच. हिस्त्र प्राण्यांची वाढ होऊन त्याचा त्रास शेतकऱ्यांना होणार आहे. काँग्रेसने याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे यांनी दिली. या पत्रपरिषदेत घनशाम मुलचंदानी, भास्कर माकोडे, अफसाना सैय्यद, विनोद बुटले, कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे आदी उपस्थित होते.
कन्हारगाव अभयारण्याविरोधात २० ग्रा.पं.चा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:39 PM