चंद्रपूर : प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मुख्याधिकारी अर्शिया जुही यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाळीचे एकूण २० किलो प्लास्टिक जप्त करून संबंधित व्यावसायिकांवर १४ हजार ७०० रुपयांचा दंड आकारला. या कारवाईने व्यावसायिकांमध्ये भीती पसरली आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या अवर सचिवांच्या निर्देशानुसार, राज्यात १ जून २०२३ पासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाळीची प्लास्टिक पिशवी वापरणे, हाताळणे, साठवणूक तसेच निर्यात करण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या पथकाने शहरातील विविध आस्थापना, भाजीपाले विक्रेते, पानठेले आदी ठिकाणी जाऊन प्लास्टिकबंदीची जप्ती मोहीम राबविली. या कारवाईत ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाळीचे एकूण २० किलो प्लास्टिक जप्त करून एकूण १४ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई मुख्याधिकारी अर्शिया जुही, करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी ईश्वर बिच्चेवार, पा. पु. व स्वच्छता अभियंता नूतन कोरडे, लेखापाल दिलीप चिले, विद्युत अभियंता मंगेश बोंद्रे, स्वच्छता निरीक्षक नितिश रगडे, वरिष्ठ लिपिक लक्ष्मीकांत आबदेव, धनंजय हटवार, कनिष्ठ लिपिक मनोहर दवे, शहर समन्वक प्रवीण काळे आदींनी केली.
शासनाने ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाळीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे व्यावसायिक, आस्थापना, हातठेले, पानठेला, भाजीपाला विक्रेत्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही प्लास्टिकमुक्त शहर करण्याच्या अनुषंगाने बाजारपेठेत जाताना कापडी पिशवीचा वापर करावा - अर्शिया जुही, मुख्याधिकारी, नगर परिषद, ब्रह्मपुरी