चंद्रपूर : औष्णिक केंद्राचे दूषित पाणी इरईत शिरल्याने मनपा प्रशासनाने चंद्रपुरातील २० टक्के पाणीपुरवठा बुधवारपासून दि. ९ बंद केला. दाताळा परिसरातील जलशुद्धीकरण प्लँट सध्या काही दिवसांपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरवठा खंडित झाल्याने शहरातील दाट लोकसंख्या असलेल्या सहा वॉर्डांमधील नागरिकांना पाणी मिळण्याचा मार्ग बंद झाला.
चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. हे धरण चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे आहे. या केंद्राचे रसायनयुक्त पाणी रानवेडली नाल्याला सोडण्यात आल्याची तक्रारी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्राची पाहणी केली. मनपा प्रशासनानेही दाताळ्याचा जलशुद्धीकरण केंद्र बंद केला. त्यामुळे चंद्रपुरातील काही भागांतील पाणीपुरवठा बंद केला आहे. परिणामी, संबंधित परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यास अडचणी आल्या आहेत. नागरिक आपल्या जवळच्या परिसरातील नळांमधून पाणी भरण्यासाठी गर्दी केल्याचे गुरुवारी दिसून आले.
पाणीपुरवठा खंडित झालेला परिसर
दादमहल वॉर्ड, हनुमान खिडकी रोड, कोहिनूर ग्राउंड परिसर, जटपुरा वॉर्ड, नगिनाबाग, चोरखिडकी परिसरातील पाणीपुरवठा काही दिवसांसाठी खंडित करण्यात आला आहे.
पीसीबीने घेतले पाण्याचे नमुने
इरईत सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने संकलित केले. हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच प्रदूषित पाण्यातील घटकांसंदर्भात माहिती मिळू शकेल, अशी माहिती सूत्राने दिली.
दाताळा परिसरातील ट्रीटमेंट प्लँट सध्या बंद करण्यात आला. त्यामुळे काही वॉर्डांतील पाणीपुरवठा बंद करावा लागला. मात्र, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यादृष्टीने टँकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित परिसराचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- विपीन पालिवाल, आयुक्त मनपा, चंद्रपूर