घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मंगळवार आणि बुधवारी धामणगाव चक आणि गिरगाव येथे घडलेल्या वाघाच्या घटनांनी परिसर चांगलाच दहशतीत आला आहे. वन विभागही चांगलाच सतर्क झाला असून या दोन्ही घटनास्थळांच्या परिसरात गस्तीसाठी २० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी १५ कॅमेरे लावण्यात आहेत. बुधवारी वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश पुंडलिक गुरूनुले रा. गिरगाव (५०) असे असून मंगळवारच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव विक्राबाई पांडुरंग खोब्रागडे (६४) असे आहे. वाघाकडून मानवावावर झालेल्या या हल्ल्याच्या दोन्ही घटना लागोपाठ आणि पाच ते सहा किमी परिसरातच घडल्याने परिसरातील गावांमधील नागरिक चांगलेच दहशतीत आले आहेत.ज्या परिसरात या घटना घडल्या तो परिसर जंगलव्याप्त आहे. या परिसरातील गावांची म्हणा किंवा नागरिकांची उपजीविकेची काही साधने जंगलावरच अवलंबून आहेत. रोज सकाळी उठल्याबरोबर या गावांचा जंगलाशीच संबंध येतो. सध्या तर मोहफुलाचा मोसम आहे. काही दिवसांनी तेंदूपत्ता संकलन सुरू होईल. गिरगाव हे तर जिल्ह्यातील केरसुणी निर्मितीचे मोठे केंद्र आहे. या गावातील अनेक कुटुंब वर्षातील सहा महिने याच कामात व्यस्त असतात. या व अन्य विविध कामांसाठी या जंगलव्याप्त गावातील नागरिकांना जंगलात जावेच लागते. नव्हे जंगलात जाणे हा त्यांचा क्रम आहे. विक्राबाई खोब्रागडे असो, नाही तर सुरेश गुरूनुले याच कामासाठी जंगलात गेले होते; पण वाघाने डाव साधला आणि एका महिलेस ठार केले तर दुसऱ्या एका व्यक्तीस गंभीर जखमी केले.
गावकऱ्यांचा जंगलाशी संबंधवाघाने हल्ला केला म्हणून नागरिकांचे जंगलाशी असलेले संबंध संपणार नाहीत. जंगलव्याप्त गावातील नागरिक आणि जंगलजन्य उपज हे अविभाज्य समीकरण आहे. पूर्ण नाही पण या गावांची निम्मी अर्थव्यवस्था याच समीकरणांवर अवलंबून आहे. म्हणूनच या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या त्या वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागही सतर्क झाला आहे. धामणगाव चक आणि गिरगाव जंगल परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या या वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी २० वन कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच १५ कॅमेरे लावण्यात आले आहेत.
पिंजरा नाहीवाघाच्या हालचाली टिपण्यासाठी फौजफाटा लावण्यात आला असला तरी या हल्लेखोर वाघास पकडण्यासाठी एकही पिंजरा लावण्यात आला नाही. या वाघाला आता मानवी रक्ताची चटक लागली असून त्याच्याकडून आणखी असे हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे टाळण्यासाठी या वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. ‘तो’ एकच वाघ? गिरगाव आणि धामणगाव चक या दोन घटनास्थळातील अंतर चार ते पाच किमीचे असून हल्लेखोर वाघ एकच असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.