पोलीस पथकाची कारवाई : दोघांवर गुन्हे दाखल चंद्रपूर : काही दिवसांपासून बल्लारशाह आणि राजुरा येथील कोळसा खदानीमध्ये कोळसा चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यापासून होणारी गुंडागर्दी सुद्धा वाढली आहे. कोळसा खाणीतून निघालेला कोळसा भरलेल्या ट्रकला थांबवून कोळसा चोरी करणे आणि ट्रक चालकास मारझोड करणे असे प्रमाण वाढल्याने कोळसा खाणीतील अधिकाऱ्यानी पोलिसांकडे धाव घेतली. याची दखल घेत पोलीस पथक तयार करून पेट्रोलिंग करण्यात आली. या पथकाने बल्लारशहा खाण परिसरात २० टन चोरीचा कोळसा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. २८ मार्च रोजी बल्लारशाह खदान परिसरात पेट्रोलिंग करीत असता, विक्की ठाकुर रा. रामपूर, राजुरा व रामचंद्र उर्फ रसीया निशाद रा. बल्लारशाह हे दोन इसम मागील काही दिवसांपासून कोळसा चोरी करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. दोन्ही इसमाने काही दिवसापूर्वी राजुरा येथील पवनी ते कढोली मार्गावर रस्त्याच्या बाजूला अंदाजे २० टन कोळसा साठवून ठेवलेला आहे, या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि गौरी ओपन कास्ट माईनचे सेक्युरिटी इन्चार्ज तात्काळ पवनी ते कढोली रस्त्यावर जावून पाहणी केली. यात तेथे अंदाजे २० टन कोळसा पडून असलेला दिसला. सदर कोळसा पोलिस पथकाने आपल्या ताब्यात घेवून गौरी ओपन कास्ट माईन येथून हायवा ट्रक व पेलोडर मशीन बोलावून जप्त केला. कोळसा ट्रकमध्ये भरून गौरी ओपन कास्ट माईन कोल स्टाक येथे काट्यावर आणून वजन केले असता सदर कोळसा १९ हजार ९४० किलो भरला. या कोळशाची किमंत एक लाख रूपये आहे. आरोपी विक्की ठाकूर रा. रामपूर व रामचंद्र उर्फ रसीया निशाद रा. बल्लारशा यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन राजुरा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
चोरीचा २० टन कोळसा जप्त
By admin | Published: March 29, 2017 1:50 AM