चंद्रपूर : एका गुंड प्रवृत्तीच्या २२ वर्षीय तरुणाला त्याच्याच तीन मित्रांनी धारदार शस्त्राने वार करून ठार केले. मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अष्टभुजा वाॅर्डातील रमाई नगरात घडलेली ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
धरमवीर यादव उर्फ डब्ल्यू (रा. अष्टभुजा वाॅर्ड) असे मृताचे नाव आहे. ही घटना उजेडात येताच स्थानिक गुन्हे शाखेने सूत्रं हलवून मुख्य आरोपी चेतन ऊर्फ सचिन सोनवणे याला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास काही तरुणांनी धरमवीर यादव याला बोलावले. यानंतर त्यांच्यात चांगलाच वाद झाला. अशातच धरमवीरवर चाकूहल्ला करण्यात आला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. आपला जीव वाचविण्यासाठी त्याने जखमी अवस्थेतच घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, त्याच्या मित्रांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. अष्टभुजा वाॅर्डातील रमा नगरात मंदिराजवळ त्याला गाठून तिघांनी धारदार शस्त्राने धरमवीरची निर्घृण हत्या केली. धरमवीर रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर तिथेच पडून होता. सकाळी ही घटना उजेडात आली. रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना एक आरोपी माेरवा परिसरातील जंगलात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सापळा रचून मोठ्या शिताफीने मुख्य आरोपी चेतन ऊर्फ सचिन सोनवणे याला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे संजय आतकुलवार, दीपक डोंगरे, प्राजस झिलपे, गणेश भोयर, चंदशेखर आसुटकर हे कारवाईत सहभागी झाले होते. दरम्यान, आरोपीला पुढील तपासासाठी रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक खाडे यांनी दिली.
मृतकावर त्याच्याच दोन भावांच्या खुनाचा आरोप
धरमवीर यादव हा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर त्याच्याच दोन भावांच्या खुनाचा आरोप होता. अन्य गुन्हेही त्याच्यावर नोंद आहेत. त्याच्या या गुंड प्रवृत्तीमुळे अष्टभुजा परिसरातील नागरिक कमालीचे दहशतीत होते. तो बाहेर असला तर नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते. त्याच्या हत्येने नागरिक मनातून आनंदी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.