लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पावसाळ्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोन क्षेत्रातील पर्यटनाला प्रतिबंध आहे. मात्र, कोरोनाचे संकट थोडे कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल करताच, ऑगस्ट महिन्यात तब्बल २० हजार पर्यटकांनी बफर झोन क्षेत्रात सफारी केली. पर्यटकांची संख्या आता दररोज वाढतच असल्याचे सध्याचे चित्र आहे. (20,000 tourists visit Tadoba; A tiger was spotted in the buffer zone) (Tadoba Andhari Tiger Project )
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना वाघाचे हमखास दर्शन होते. वाघ व बिबट्यांची संख्या वाढल्याने बफर झोनमध्येही वन्यजीव दर्शनाचा आनंद घेता येतो. परिणामी, बफर क्षेत्रातही पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. या प्रकल्पात पर्यटकांना २० प्रवेशद्धारांतून आत जाता येते. पावसाळा सुरू असल्याने कोअर झोनचे सर्व सहाही प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत.
बफर क्षेत्रात जाण्यासाठी १४ प्रवेशद्वार आहेत. यातील मामला, आगरझरी, मदनापूर, देवाडा- अडेगाव, निमदेला, जुनोना, रामदेगी, अलिझंझा, कोलारा, खिरकाळा, पांगडी, झरीपेठ, केसलाघाट असे १३ प्रवेशद्वार पर्यटकांसाठी सुरू आहेत. बेलारा-गोंड मोहाडी हे प्रवेशद्वार सद्यस्थितीत बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोना निर्बंधात शिथिलता दिल्याने राज्यासह देशभरातील पर्यटकांची पावले ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राकडे वळली आहेत.