चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली मंडळात २१ हजार ३०४ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. चंद्रपूर मंडळात ११ हजार ६ तर गडचिरोलीत १० हजार २९८ नवीन वीज जोडण्या झाल्या. नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रलंबित वीज जोडण्या कार्यान्वित करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. गतवर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे लॉकडाऊन असल्याने नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. महावितरणच्या चारही प्रादेशिक कार्यालयांना मार्चअखेरपर्यंत ३ लाख ३५ हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. येत्या एप्रिल महिन्यात सुमारे साडेतीन लाखांवर नवीन वीजमीटर पुरविण्याचे नियोजन आहे. वीजमीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध झालेले मीटर तातडीने ग्राहकांकडे कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. ग्राहकांना खुल्या बाजारातून नवीन वीजमीटर खरेदी करण्याची आता आवश्यकता नाही, असेही महावितरणने स्पष्ट केले. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक तसेच कृषी अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांना नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल अॅपवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
चंद्रपूर परिमंडळात २१ हजार ३०४ नवीन वीज जोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:29 AM