बल्लारपूर : पंचायत समिती बल्लारपूर अंतर्गत येत असलेल्या निवृत्तीधारक २१५ पेन्शनर शिक्षकांचा पगार मागील दोन महिन्यांपासून झाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तर ११० नियमित शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन थकीत असल्यामुळे सर्व शिक्षकांनी शुक्रवारी दुपारी पंचायत समिती कार्यालयात संवर्ग विकास अधिकारी नसल्यामुळे गोंधळ घातला.
शिक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बल्लारपूर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत निवृत्तीधारक २१५ पेन्शनर शिक्षक आहेत. त्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. त्यासाठी ते वारंवार पंचायत समितीच्या लिपिकाकडे चकरा मारत आहेत. परंतु लिपिक म्हणतो, चेकवर सहीच नाही तर मी काय करू. येथील संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनवडे हे दीर्घ रजेवर असल्यामुळे त्यांचा प्रभार राजुरा येथील संवर्ग विकास अधिकारी सांभाळत आहेत. परंतु तेही लग्नाला गेल्यामुळे शिक्षकांच्या खात्यात चेक आला नाही. त्यामुळे सर्व शिक्षकांनी पंचायत समितीमध्ये जाऊन गोंधळ घातला तर दुसरीकडे तालुक्यातील नियमित ११० शिक्षक व तीन केंद्रप्रमुख यांचाही जुलै महिन्याचा पगार झाला नसल्यामुळे तेदेखील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.
कोट
कोरोनाच्या संकटात शिक्षकवर्गही या महामारीचा सामना करीत आहे. अशावेळी पेन्शनच्या भरवशावर निवृत्तीधारक शिक्षक आपली उपजीविका करीत आहे. अशा वेळी दोन महिन्यांचा पगार न झाल्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे.
-विजय कांबळे, पेन्शनर शिक्षक.