खडसंगी : ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या चिमूर पंचायत समितीमध्ये अधिकारी प्रवर्गापासून चतुर्थ श्रेणीतील असे २२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांना कामासाठी पायपीट करावी लागत आहे. सद्यस्थितीत असलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना जादा कामाचा भार सोसावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या चिमूर पंचायत समितीमध्ये जिल्ह्याचा सर्वात जास्त ९८ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्यामुळे या पंचायत समितीला उच्च श्रेणीचा दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून या कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यापासून बांधकाम अभियंत्यापासूनचे पदे आजही रिक्त आहेत. तर अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागासुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कामाचा व्याप वाढलेला आहे.शासनाने चालविलेल्या अनेक योजना पंचायत समितीमार्फतीने राबविल्या जात आहे. पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पंचायत अशा अनेक विभागाच्या वतीने नागरिकांना योजनांचा लाभ दिल्या जातो. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत विकासाच्या अनेक योजनासुद्धा पंचायत समिती स्तरावरुन राबविल्या जातात. मात्र पंचायत समितीमध्ये अधिकारी, अभियंता, लिपीक अशा दर्जाचे २२ पदे रिक्त असल्याने नागरिकांना अनेक योजनांच्या लाभासाठी कार्यालयात येताच परत जावे लागते. कर्मचारी नसल्याने साहेब नाही आहेत, उद्या या, आज काम होत नाही, असे सांगून आल्या पावली परत जावे लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना पंचायत समिती ते त्यांचे गाव अशी पायपीट करण्याची वेळ आली आहे.शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून शिक्षणासारख्या क्षेत्रातसुद्धा पंचायत समिती स्तरावरील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे चार पदे रिक्त असल्याने शिक्षण बालहक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने या बाबीकडे लक्ष देऊन रिक्त असलेल्या पदाचा भरणा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
चिमूर पंचायत समितीत २२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
By admin | Published: July 21, 2014 12:05 AM