लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासन निर्णय फेब्रुवारी २००० अन्वये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यास व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन समिती कार्यरत आहे. या समितीला आतापर्यंत जिल्ह्यात २२१ धाडी टाकल्या. त्यापैकी ३३ प्रकरणांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती आढावा बैठकीतून पुढे आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात याबाबत आढावा घेतला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, जिल्हा साथरोग अधिकारी मीना मडावी आदींसह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाशी संबंधित संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
हॉस्पिटल्स मेडिव्हेस्टचे काय होते?बोगस डॉक्टर शोध समितीमार्फत जिल्ह्यात ३३ प्रकरणांत नोंदविलेल्या एफ.आय.आर.बाबत पुढील कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना पोलिस विभागास त्यांनी दिल्या. नर्सिंग होम आणि मोठ्या हॉस्पिटल्समधून होणाऱ्या मेडिव्हेस्टचे योग्य व्यवस्थापन होते की नाही, याचीही तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.
नर्सिंग होम आणि आणखी काही...शहरी किंवा ग्रामीण भागातील विना परवानगीने चालविण्यात येणाऱ्या नर्सिंग होमची माहिती घ्यावी, अशा नर्सिंग होमला शेवटची नोटीस द्यावी. त्यांचे नर्सिंग होम तात्काळ बंद करावी, परवानगीनुसार सुरू असलेले नर्सिंग होम तथा दवाखाने परवानगीच्या अटी व शर्तीनुसार चालतात का, नियमांचे काटेकोर पालन होते की नाही, याची तपासणी करावी. यासंदर्भात कोणतीही तक्रार आल्यास तात्काळ चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आरोग्य विभागाला दिले. समितीमार्फत आजपर्यंत १२१ धाडी टाकण्यात आल्या. त्यापैकी ३३ प्रकरणात एफ.आय.आर. नोंदविण्यात आली, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांनी बैठकीत दिली. जिल्हा परिषद व मनपा आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.