लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा येथील भारतीय स्टेट बँकेच्याचिमूर मार्गालगत असलेल्या एटीएम मशीनचे लॉक हॉयजॅक करून अज्ञात चोरट्याने २३ लाख रुपये लंपास केले. ९ फेब्रुवारी रोजी घडलेली ही घटना सोमवारी उघड होताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणी बँकेने वरोरा पोलिसात तक्रार दिली आहे. सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला असला तरी तो स्पष्ट ओळखू येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.सदर एटीएम मशीन चिमूर रस्त्यालगत आनंद निकेतन महाविद्यालयासमोरील एका खासगी वास्तूमध्ये आहे. या एटीएममधून २३ लाख रुपये लंपास झाल्याचा संशय ९ फेब्रुवारी २०१८ रोजीच बँक व्यवस्थापनाला आला. पाहणी केली असता मशीनला कुठेही तोडफोड झालेली नसल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने एटीएम मशीन लॉकचे पासवर्ड देवून उघडले आणि २३ लाख रुपये लंपास केल्याचा संशय आला. मात्र मशीनच्या लॉकबाबत शंका आल्यास व ते बदलावयाचे असल्यास वरिष्ठ कार्यालयाची परवानगी अनिवार्य आहे. त्यानंतर हैद्राबाद येथून तज्ज्ञांमार्फत लॉक बदलून दिला जातो. २६ मार्च रोजी हैद्राबाद येथून आलेल्या तज्ज्ञाने लॉकची तपासणी केली असता पासवर्डच्या सहाय्याने लॉक उघडून त्यातील २३ लाख रुपये लंपास झाल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता एक व्यक्ती तोंडावर कापड बांधून आल्याचे त्यात कैद झाले आहे. परंतु त्याचा चेहरा अस्पष्ट असल्याने सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारला असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, चंद्रपूर एलसीबी अधिकारी व त्यांच्या चमूने भेट देवून पाहणी केली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
चंद्रपूर जिल्ह्यात एटीएम मशीनमधून उडविले २३ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:25 PM
वरोरा येथील भारतीय स्टेट बँकेच्याचिमूर मार्गालगत असलेल्या एटीएम मशीनचे लॉक हॉयजॅक करून अज्ञात चोरट्याने २३ लाख रुपये लंपास केले.
ठळक मुद्देफेब्रुवारीतील घटना उघडकीस आली मार्चमध्ये