नागरिक समाधानी : चिरादेवी ग्रामपंचायतीने ठेवला नवा आदर्शभद्रावती : संपूर्ण राज्यात पाण्याचा दुष्काळ असताना छोट्याशा गावात नागरिकांना २४ तास मुबलक पाणी देण्याचा संकल्प चिरादेवी ग्रामपंचायतीने केला आहे. येथील सरपंच वासुदेव ठाकरे यांनी घरातील प्रत्येक नळाला २४ तास पाणी देऊन नियंत्रणासाठी मीटर बसविले. हा प्रयोग जिल्ह्यातील एकमेव आहे.तालुक्यातील चिरादेवी हे गाव ८०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील सरपंच हे शिवसेना पक्षाशी निगडीत असून दोन पंचवार्षिकमध्ये निवडून सरपंच या पदावर आहे. त्यासोबतच त्यांची पत्नी जयश्री ठाकरे यादेखील ग्रामपंचायत सदस्य आहेत. गावातील विकास म्हणजे प्रत्येक नागरिकांचा विकास हे समीकरण डोळ्यासमोर ठेवून पंचायत समिती, जिल्हा परिषद, वेकोलि प्रशासन, आमदार फंड, खासदार फंड मिळेल त्या फंडातून गावाच्या विकासाला महत्त्व दिले. पूर्वी या गावात पाण्याची भीषण टंचाई होती. परंतु आज या गावाची पाण्याचे गाव म्हणून तालुक्यात ओळख आहे. या गावातील ४० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अवघ्या एका वर्षात बांधून संपूर्ण गावाची तहान भागवली. गावकऱ्यांना दोन वेळेस मूबलक पाणी मिळायला लागले. आता २४ तास गावकऱ्यांना पाणी देण्यात येत आहे. यासाठी १३० नळजोडणी देण्यात आली असून त्यावर मीटर बसविण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभ १ जूनला करण्यात आला. गावातील नागरिक पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा वापर करेल, पाण्याचा अपव्यय होणार नाही, जर कोणी अपव्यय केला तर त्याला मीटर रिडींगप्रमाणे आर्थिक भुर्दंड भरावे लागेल. या योजनेचे संपूर्ण गावासह तालुक्यातसुद्धा स्वागत करण्यात आले.गावातील काही नागरिकांकडे खासगी बोअरवेल आहे. काही निकामी झाल्या आहेत. अशाकडे कनेक्शन देणे चालु आहे. या योजनेचा लाभ संपूर्ण गावकऱ्यांना मिळणार असल्याचे वासुदेव ठाकरे यांनी सांगितले. या चिरादेवी गावाची विकासाकडे वाटचाल सुरू असून येथील विजेचा लंपडाव लक्षात घेता गावातील चौकाचौकात सौर ऊर्जेवर चालणारे ४० पथदिवे लावण्यात आले आहे. प्रत्येक गल्लीत सिमेंट रस्ते, रस्त्यांच्या कडेला कडूलिंब व निलगिरी वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. येथील ९८ टक्के नागरिकांनी स्वत:च्या घरी शौचालय बांधले असून १०० टक्के हागणदारीमुक्त गाव आहे. आता या गावातील प्राथमिक शाळेत ई-लर्निंग सुरू झाले असून ही शाळा अत्याधुनिक करण्याचे कार्य सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)
नळाला २४ तास मुबलक पाणी !
By admin | Published: June 16, 2016 1:39 AM