मूल: तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींपैकी २४ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज चालणार असून सरपंचपदी २४ महिला विराजमान होणार आहेत. महिला आरक्षणामुळे महिलांना सत्तेत सहभागी होण्याची नामी संधी या निमित्ताने चालून आली आहे. आरक्षणाने गावागावांत ‘कही खुशी, कल्ली गम’ अशी परिस्थिती पहायला मिळत आहे. मूल तालुक्यातील टेकाडी, सुशी दाबगाव, ताडाळा तुकूम, अनुसूचित जाती सर्व साधारणसाठी तर चिरोली, गडिसूर्ला, बेंबाळ अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असणार आहे. अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी मुरमाडी, काटवन चक, नलेश्वर मोकासा, आकापूर तर जमातीच्या महिलांसाठी पिपरी दीक्षित, जानाळा रै., बोरचांदली, चिंचाळा राखीव असणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी मरेगाव, येरगाव, नांदगाव, उथळपेठ, नवेगाव भुजला, विरई, खालवसपेठ तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी बाबराळा, चिखली, माल, राजगड, चांदापूर, टोलेवाही, दाबगाव मक्ता, खुला प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी बोंडाळा बुज, भेजगाव, मोरवाही माल, भवराळा, बोडाळा खुर्द, डोंगरगाव, सिंतळा, उश्राळा चक, चकदुगाळा, राजोली तर खुले प्रवर्गातील महिलांसाठी गोवर्धन, चिमढा, जुनासूर्ला, मारोडा, भादुर्णी, चितेगाव, कोसंबी, हळदी, गावगन्ना, फिस्कुटी, केळझर, गांगलवाडी या गावाचा समावेश आहे. मूलचे तहसीलदार सोनवाणे, संंवर्ग विकास अधिकारी मापारी, निवडणूक नायब तहसीलदार गीता येनूरकर यांच्या उपस्थितीत नुकतेच ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी गावातील सरपंच, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.मूल तालुक्यातील ४८ पैकी ३८ ग्रापपंचायतीची निवडणूक येत्या आॅगस्ट- सप्टेंबर महिन्यात होणार आहे. ऐन पावसाळ्यात होणाऱ्या या निवडणुकांचे वातावरण आतापासूनच तापायला सुरूवात झाली आहे. त्या अनुषंगाने राजकीय हालचालींना चांगलाच वेगही आला आहे. निवडणुकी संदर्भात गावागावांत व्यूहरचना आखली जात असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
२४ गावांत महिलाराज
By admin | Published: April 05, 2015 1:36 AM