मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भारतीय रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) मागील सात वर्षांत 'नन्हे फरिश्ते' या ऑपरेशनचे नेतृत्व करून ८४ हजार ११९ मुलांची सुटका केली. यामध्ये बल्लारशाह रेल्वे स्थानकावर २४७ मुले व १९५ मुलींची सुटका करण्यात आली. जिल्हा बालकल्याण समितीला सुपूर्द करून समितीने त्या मुलांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.
रेल्वे जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ ते मे २०२४ या सात वर्षांच्या काळात भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये पीडित मुलांना वाचवण्यासाठी 'नन्हे फरिश्ते' नावाचे मिशन सुरू आहे. यादरम्यान चुकीने रेल्वे गाडीत बसून आलेल्या मुला-मुलींची माहिती रेल्वे सुरक्षा दलास मिळताच ते तत्परतेने चाइल्ड लाइनच्या मदतीने बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात येते. १३५ च्या वर रेल्वे स्थानकावर चाइल्ड लाइन हेल्प डेस्क उपलब्ध आहेत.
अशी आहे आकडेवारी
- २०१८ मध्ये 'ऑपरेशन नन्हें फरिश्ते'ची सुरुवात झाली. त्यावर्षी आरपीएफने एकूण १७ हजार ११२ मुला-मुलींची सुटका केली. २०१९ या वर्षात एकूण १५ हजार ९३२ मुला-मुलींची सुटका करण्यात आली. यात १२ हजार ७०८ पळून गेलेली, १ हजार ४५४ बेपत्ता, एक हजार ३६ विभक्त, ३५० निराधार, ५६ अपहरण, १२३ मतिमंद व १७१ बेघर बालके होती.
- कोविड महामारीत (२०२०) सामान्य जीवन विस्कळीत झाले होते. त्याचा कामकाजावर लक्षणीय परिणाम झाला. या आव्हानांना न जुमानता आरपीएफने पाच हजार ११ मुलांची सुटका केली.
- २०२१ या वर्षात ९६०१ पळून गेलेली मुले, ९६१ बेपत्ता, ६४८ विभक्त, ३७० निराधार, ७८ अपहरण, ८२ मानसिकदृष्ट्या अपंग, रस्त्यांवरील १२३ मुले होती. तर २०२२ मध्ये १७ हजार ७५६ व २०२३ मध्ये आठ हजार ९१६ मुले पळून गेली, ९८६ बेपत्ता, १० हजार ५५ विभक्त, २३६ निराधार, १५६ अपहरण, ११२ मानसिक अपंग, रस्त्यांवरील २३७ मुले होती.
- २०२४ च्या पहिल्या पाच महिन्यांत आर- पीएफने चार हजार ६०७ मुलांची सुटका केली आहे. ज्यामध्ये तीन हजार ४३० पळून गेलेल्या मुलांची सुटका करण्यात आली आहे.
'ऑपरेशन नन्हें फरिश्ते' या ऑपरेशन तर्फे सात वर्षात ८४ हजार ११९ मुलांची सुटका केली आहे. कारवाईत आरपीएफ यासह चाइल्ड लाइन हेल्प डेस्कचे सुध्दा सहकार्य लाभत असते.- सुनील पाठक, आरपीएफ कार्यालय निरीक्षक, बल्लारशाह