चंद्रपूर : वाहनाच्या वाढत्या संख्येबरोबर अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनामुळे मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला. यामध्ये घराबाहेर पडण्यावर बंदी होती; मात्र तरीसुद्धा २०२० मध्ये २४९ जणांचा विविध अपघातांत बळी गेला आहे; तर २०१९ मध्ये २६७, तर २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत १४४ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरून लॉकडाऊनमध्ये फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सिद्ध होत आहे.
दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याऊलट रस्त्यावर वाढणारे अतिक्रमण यामुळे पूर्वीचे अरुंद असलेले रस्ते पुन्हा अरुंद झाले आहे. परिणामी महामार्गावर घडणारे अपघात आता गल्लोगल्ली दिसून येतात. अनेकजण नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवितात. त्यामुळेही अपघाताची संख्या वाढत आहे. कोरोनाने मार्च २०२० पासून जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आले. यावेळी बाजारपेठ बंद होत्या. केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडण्याची परवानगी होती. तरीसुद्धा जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. २०१९ मध्ये ६०७ अपघात घडले. यामध्ये २६७ जणांचा बळी गेला, तर २५६ जण जखमी झाले, तर २०२० मध्ये ५६५ अपघात घडले असून, २४९ जणांचा बळी गेला, तर २०४ जण जखमी झाले, तर २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत २७८ अपघात झाले. यात १४४ जणांचा मृत्यू, तर ८९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
बॉक्स
मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश
मागील तीन ते चार वर्षांपासूनची अपघातातील मृतांची आकडेवारीचा विचार केल्यास यामध्ये सर्वाधिक मृत्यू हा तरुणांचा झाला आहे. बेपर्वाइने वाहने चालविल्याने अपघात घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुलांच्या हातात वाहनाची किल्ली देताना पालकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे दिसून येते.
बॉक्स
पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका
अनेकजण दारू पिऊन वाहने चालवितात. त्यामुळे बऱ्याचदा रस्त्याकडेने जाणाऱ्या व्यक्तीला वाहनाने उडविल्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये पादचाऱ्यांचा काहीही दोष नसताना त्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पायी चालतानाही दोन्ही बाजूला बघूनच जाणे गरजेचे आहे.
बॉक्स
या ठिकाणी वाहने हळू चालवा
रस्ता सुरक्षा समितीकडून नोंदविण्यात येणाऱ्या निष्कर्षानुसार अपघातप्रवण ठरविण्यात येतात. जिल्ह्यात २८ ब्लॅकस्पॉट होते. दहा ब्लॅक्स्पॉटची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे १८ ब्लॅक्स्पॉट आहेत. यामध्ये पडोली, कोंडाफाटा राष्ट्रीय महामार्ग, बंगाली कॅम्प, चुनाळा टी पॉईंट, सोंडो (राजुरा आसिफाबाद), आर्वी, घोडपेठ, पांढरपौनी, गडचांदूर, कोरपना, केसलाघाट, वलनी, खेडी फाटा, व्याहाड आदी ब्लॅक्स्पॉट ठरविण्यात आली आहेत.
बॉक्स
लॉकडाऊनमध्ये अपघात कमी झाले, पण...
कोरोनाचे रुग्ण आढळताच मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू करण्यात आले. यामध्ये अत्यावश्यक कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर निर्बंध होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात १२ अपघात झाले. परंतु, पुन्हा निर्बंध शिथिल होताच अपघाताच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे २०२० मध्ये वर्षभरात २४९ जणांना जीव गमवावा लागला.
-----
वेळ अमूल्य; पण जीवनही अमूल्य!
अनेकजण सुसाट वाहने पळवित असतात, तर बहुतेकजण स्टंटबाजी करीत असतात. त्यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे. जेवढ्या वेगाने वाहन धावेल तेवढाच अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे वाहने हळू चालविणे आवश्यक आहे.
- प्रतिश मोटघरे, भद्रावती
---------
लवकरच जायचे असल्याचे म्हणत अनेकजण वाहन पळवितात. परंतु, घाईने जायचे असल्यास थोडे लवकर निघावे. परंतु, वाहनाचा वेग हा प्रमाणात ठेवावा. तसेच वाहन चालविताना नियमांचे पालन करावे, हेल्मेट घालूनच वाहन चालवावे.
- मृणाल गेडाम, चंद्रपूर
-----