प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील मंडल कृषी अधिकारी, शेगांव (बु.) आत्मा प्रकल्प, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पारंपरिक पीक पद्धतीअंतर्गत शेगाव मंडलातील सोनेगाव व पिंपळगाव येथे जवस पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले. त्यानुसार गावातील २५ शेतकऱ्यांनी सेंद्रिय व जैविक पध्दतीने मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधित वाण एलएसएल - ९३ची प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर पेरणी केली आहे.भारतात अन्नधान्य भरपूर असले तरी गळीत धान्य मोठया प्रमाणात आयात करावे लागते. त्यामुळे गळीत धान्याचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मंडल कृषी अधिकारी, शेगांव बु. अंतर्गत मागील चार वर्षात भुईमूग, मोहरी, तीळ, जवस या पिकाचे विविध प्रयोग राबवून गळीत धान्य क्षेत्र वाढ करण्याचे कार्य अविरत सुरू आहे.सेंद्रिय शेतीमध्ये सदैव कार्यरत असलेले पिंपळगाव येथील शेतकरी नत्थू गारघाटे यांनी सांगितले की, पांढरी फुले असलेली व भरपूर फुटवे असलेल्या या जवस वाणांचे उत्पादन निश्चितच पाच ते सहा क्विंटल प्रतिएकरी येणार आहे.या गावाचे शेतकरी अशोक भिमटे, संदीप भोगेकर, वंदना गारघाटे, मुरलीधर भोंगळे, सोनेगाव येथील प्रगतशील शेतकरी जयंत बुराण, राहुल खिरटकर, देविदास लिल्हारे, कवडू ठाकरे, वसंता बुराण आदी शेतकऱ्यांनी यावर्षीच्या लागवडीमधून उत्पादित होणाऱ्या जवसापासून गटाच्या माध्यमातून लाकडी तेलघाण्याच्या साहाय्याने तेल काढून विक्री करण्याचा मानस बोलून दाखविला. तसेच शिल्लक साठा बियाणे म्हणून पुढील हंगामात इतर शेतकऱ्यांना पुरवठा करणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बरहाटे व प्रकल्प उपसंचालक (आत्मा) रवींद्र मनोहरे यांच्या मार्गदर्शनात मंडल कृषी अधिकारी विजय काळे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल घागी यांच्या नियोजनातून वरोरा तालुक्यात जवस लागवड क्षेत्र वाढत आहे. शेगाव बु. मंडलातील कृषी सहाय्यक पवन मडावी, लता दुर्गे, माधुरी राजूरकर, पवन मत्ते, पामलवाड, डोळस आदी गळीत धान्य क्षेत्र वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत.
जवस तेलाचे अनेक फायदे१५ ते २० वर्षांपूर्वी रब्बी हंगामात जवस लागवड हमखास केली जायची. उत्तम आरोग्यासाठी जवस तेलाचा वापर दररोजच्या आहारात केला जात होता. सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होत होती. परंतु कालांतराने सोयाबीन व पाम तेलाचा वापर वाढल्यामुळे जवसाचे क्षेत्र कमी होत गेले. सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी पिकाकडे वळला आहे.