साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चालू सत्रापासून जिल्ह्यातील तब्बल २५० विद्यालयांमध्ये इयत्ता ११ व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. यासाठी विविध विद्यालयांमध्ये मशीनही बसविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना येता-जाता या मशीनवर हजेरी लावावी लागणार आहे. परिणामी तासिका बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता अंकुश लागणार आहे. उपस्थिती कमी असेल तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसारख्या विविध सुविधांचा लाभही मिळणे कठीण होणार आहे. विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग आणि विद्यालयामध्ये उपस्थित राहण्याचा टाईमिंग जुळवताना कसरत करावी लागणार आहे.दहावी आणि बारावी परीक्षांकडे आयुष्याचा टर्निंग पार्इंट म्हणून बघितले जाते. त्यामुळे प्रत्येकजण या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे, आपल्या पाल्याने बारावीमध्ये जास्तीत जास्त गुण घ्यावे, यासाठी पालकांची धडपड असते. यासाठी कितीही खर्च करण्याच्या तयारीत ते असतात. त्यामुळे ते विविध महागडे खासगी शिकवणी वर्गही लावतात. या सर्वामध्ये मात्र विद्यार्थ्यांची दमछाक होत असून अनेक विद्यार्थी विद्यालयामध्ये जाण्याचे टाळतात. परिणामी विद्यालयांमध्ये ११ व १२ वीचे वर्र्ग केवळ नावापूरते दिसून येतात. विद्यार्थीच वर्गात येत नसल्याने शिक्षकांचीही जबाबदारी कमी झाली आहे. चार, दोन विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कष्ट ते घेण्याच्या मानसिकतेत नसतात. परिणामी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत आहेत. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी शासनाने विद्यालयांतील बारावी विज्ञान वर्गांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्यालयामध्ये जावून हजेरी लावावी लागणार आहे. सदर हजेरी आॅनलाईन प्रणालीमध्ये जोडण्यात येणार असून यावर थेट शिक्षणाधिकारी लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे कोणता विद्यार्थी विद्यालयात उपस्थित आहे किंवा नाही. कोणाची किती दिवसांची बुट्टी आहे, हे सर्व त्यांना कळणार आहे. विद्यार्थ्यांच्या विद्यालयातील उपस्थितीवर प्रात्याक्षिक मार्क आणि शिष्यवृत्तीही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे खासगी कोचिंग क्लास करायचे की विद्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहून अभ्यास करायचा, अशा पेचात विद्यार्थी व पालक वर्ग सापडले आहेत.गरीब विद्यार्थ्यांना सोईचे१२ वी विज्ञानमध्ये बहुतांश विद्यार्थी शिकवणी वर्ग लावतात. कनिष्ठ महाविद्यालयात नावापुरताच प्रवेश असतो. विद्यार्थ्यांच्या अनुस्थितीमुळे शिक्षकही वर्ग घेण्यासाठी उत्सुक नसतात. गरीबीमुळे जे विद्यार्थी शिकवणी वर्ग लावत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आता बायोमेट्रिक प्रणालीमुळे शिकवणी वर्गाला जाणाºया विद्यार्थ्यांची मोठी पंचाईत होणार आहे.शिकवणी वर्ग संचालकांची कोंडीविद्यालयांतील वर्गांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात येणार असल्यामुळे शिकवणी वर्ग संचालकांची मोठी कोंडी होणार आहे. बहुतांश विद्यालयात १२ वीचे वर्ग दुपारी भरविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णवेळ विद्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. यामुळे कोचिंग क्लास केवळ सकाळी आणि सायंकाळीच घ्यावे लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांसह शिकवणी वर्ग संचालकांनाही वेळेचे नियोजन करावे लागणार आहे.इयत्ता ११ व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी चालू सत्रापासून बायोमेट्रिक प्रणाली येत आहे. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये हजेरी लावावी लागणार आहे. कोणता विद्यार्थी कितीवेळ वर्गामध्ये उपस्थित होता. हे कळणार असून शिक्षकांनाही पूर्णवेळ वर्ग घ्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील २५० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही प्रणाली लावण्याचे काम सुरू आहे.- संजय डोर्लीकरशिक्षणाधिकारी(माध्य.) जि.प.चंद्रपूर
२५० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये चालू सत्रापासून ‘बायोमेट्रिक’ हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:08 PM
चालू सत्रापासून जिल्ह्यातील तब्बल २५० विद्यालयांमध्ये इयत्ता ११ व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. यासाठी विविध विद्यालयांमध्ये मशीनही बसविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना येता-जाता या मशीनवर हजेरी लावावी लागणार आहे. परिणामी तासिका बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता अंकुश लागणार आहे.
ठळक मुद्देइयत्ता ११ व १२ वी विद्यार्थ्यांच्या हजेरीवर नजर : शिष्यवृत्ती व प्रात्यक्षिक गुणांवरही परिणाम