लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गरीब, गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर रेशनकार्ड महत्त्वाचे मानले जाते. मात्र आजही अनेक नागरिकांकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे अशा नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते. दरम्यान, जिल्ह्यातील तब्बल २७ हजार ५२० असंघटित तसेच स्थलांतरित कामगारांकडे रेशनकार्ड नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आता या कामगारांना पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनकार्ड वितरण केले जाणार आहे.
स्थलांतरित तसेच असंघटित कामगारांना रेशनकार्ड वितरण करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. त्यानंतर नियमानुसार पडताळणी, तपासणी करून स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिका वितरित करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना क्षेत्रीय यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. यासाठी अन्न नागरिक व ग्राहक संरक्षण विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कामगार विभागाकडून पुरवठा विभागाला तालुकानिहाय यादी देण्यात आली आहे. यानुसार रेशनकार्ड तयार करून दिले जात असल्याचे अन्न धान्य वितरण अधिकारी सुमेर चवरे यांनी सांगितले.
काय लागणार कागदपत्र कुटुंबातील सर्वांचे आधारकार्ड, बैंक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, मतदान ओळखपत्र, लाईट बिल, गॅस पासबुक.
कर्मचाऱ्यांची तत्परता जिल्ह्यातील २७ हजार ५२० असंघटित कामगारांना रेशनकार्ड देण्यासाठी पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. विभागाकडून आलेल्या नावानुसार संबंधित काम- गारांपर्यंत पोहचून त्यांना रेशनकार्ड काढण्यासंदर्भात सांगितल्या जात आहे. संपूर्ण कागदपत्र घेऊन येणाऱ्या कामगारांना तत्काळ रेशनकार्ड काढून दिले जात आहे.
कामगारांना दिलासा मागील अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात असंघटित कामगार काम करीत आहेत. मात्र त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांसह धान्यापासूनही वंचित रहावे लागत होते. यासंदर्भात न्यायालयाने स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिकांचे वितरण करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार आता या कामगारांना रेशनकार्ड दिले जात असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
कार्यालयात बोलावून रेशनकार्डचे वितरण जिल्ह्यातील बहुतांश असंघटित कामगारांकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे कामगार विभागाकडून आलेल्या यादीनुसार पुरवठा विभाग संबंधित कामगारांसोबत संपर्क साधून त्यांना कार्यालयातून बोलावून रेशनकार्डचे वितरित करीत आहे.
"असंघटित तसेच स्थलांतरित कामगारांना रेशनकार्ड तयार करून दिले जात आहे. आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या तहसील कार्यालयातील शिधावाटप कार्यालयात जाऊन रेशनकार्ड काढून घ्यावे. यासाठी विशेष मोहीम राबविणे सुरू करण्यात आले आहे."- राहुल बहादूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर