ज्ञानेश्वर शिरभैय्ये
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नागरिकांच्या लसीकरणाकरता शासनाकडून देण्यात आलेले लसींचे तब्बल २७०० डोस भिसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका कष्टी, आरोग्य सहायिका शीला कराळे व इतर तीन पारिचारिका यांच्या हलगर्जीपणामुळे गोठून खराब झाले.
भिसी प्रा.आ. केंद्राला कवच कुंडल योजनेअंतर्गत मिळालेले कोविशिल्ड लसींचे २६०० व कोव्हॅक्सिन लसींचे १०० डोस शीतसाखळी खोलीतील फ्रीझरमध्ये न ठेवता डीप फ्रीझरमध्ये चुकीने ठेवल्यामुळे लसींचे सर्व डोस गोठले व खराब झाले. या डोसची किंमत लाखोंच्या घरात असल्याची माहिती आहे.
लसींचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी. शीतसाखळी केंद्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या शीला कराळे यांची होती. तसेच लसी सुरक्षित ठेवल्या आहेत की नाही, याची दिवसातून किमान दोनदा खात्री करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी प्रियंका कष्टी यांची होती. मात्र, वैद्यकीय अधइकारी व शीला कराळे यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसींचा साठा खराब होण्याचे राज्यातील बहुतेक हे पहिलेच प्रकरण असावे.
कर्तव्य पालनात हयगय केल्याचे निदर्शनास आल्यामुळे चंद्रपूर जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी डॉ. प्रियंका कष्टी, शीला कराळे यांना १३ ऑक्टोबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासांच्या आत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच तुमच्याकडून वाया गेलेल्या लसींची पूर्ण रक्कम का वसूल करण्यात येऊ नये, असेही विचारले आहे.
'लसींचा साठा खराब झाल्याची बाब लक्षात येताच ताबडतोब वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहायिका यांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. चौकशी सुरू आहे, उचित कार्यवाही करण्यात येईल'
- डॉ. राज गडलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर