तंटामुक्त गाव अभियान : राज्य शासनाने दखल घेण्याची मागणीचंद्रपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार गावोगावात तंटामुक्त समित्या कार्यरत आहेत. ज्या समित्यांकडून चांगले कार्य झाले अशा, समित्यांना शासनाकडून शांतता पुरस्कार देऊन गौरव केला जातो. शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील साडेपाचशेंवर गावांना मागील नऊ वर्षात शांतता पुरस्कार प्राप्त झाला. मात्र यापैकी अद्यापही अडीचशेहून अधिक गावे शांतता पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत.दहा वर्षापूर्वी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान शासनाने सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून गावातील तंटे गावात मिटू लागले. गावांना प्रोत्साहन मिळावे, गावांनी या मोहिमेत मोठ्या संख्येत सहभागी व्हावे म्हणून गावांना पुरस्कार देण्याचीही तरतूद शासनाने अभियानात केली. पुरस्कारासाठी गावात स्थापन तंटामुक्त समितीने केलेल्या वर्षभरातील कामगिरीचे मुल्यमापन करून गुणदान केले जाते. यासाठी तालुकाबाह्य आणि जिल्हाबाह्य समितीद्वारे गावांचे मूल्यमापन केले जाते. मूल्य मापनासाठी २०० गुणांचे निकष ठेवण्यात आले. यात तंटे निवारण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ८०, दाखल तंटे मिटविणे यासाठी १०० तर नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे यासाठी २० गुण ठेवण्यात आले आहे. तंटामुक्त गाव जाहीर होण्यासाठी अनुक्रमे ५६, ७०, १४ गुण मिळणे आवश्यक आहे. मूल्यमापनात किमान गुणांची बेरीज १४० येत असेल तर गाव तंटामुक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येते. तंटामुक्त जाहीर गावांना त्यांच्या लोकसंख्येवर आधारित पुरस्कार दिला जातो. तर १९० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना पुरस्काराशिवाय मिळालेल्या रकमेच्या २५ टक्के रक्कम अधिक दिली जाते. २००७ पासून जिल्ह्यातील ५७५ गावांना तंटामुक्त शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला असून उर्वरित गावे प्रतीक्षेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)१२ पोलीस ठाणे तंटामुक्त घोषिततंटामुक्त अभियानाच्या मागील दहा वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील १२ पोलीस ठाणे संपूर्ण तंटामुक्त घोषित करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस विभागाचे सहा उपविभाग आहेत. या उपविभागाअंतर्गत ३२ पोलीस ठाणे येतात. चंद्रपूर उपविभागातील चंद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत सात गावांचा समावेश असून ही सातही गावे तंटामुक्त झाली आहेत. उपविभाग मूलअंतर्गत पोंभूर्णा पोलीस ठाण्यात २० गावांचा समावेश असून ही संपूर्ण गावे तंटामुक्त घोषित झाली आहेत. उमरी पोलीस ठाणे हद्दीतील चारही गावे तंटामुक्त जाहीर करण्यात आली आहेत. राजुरा पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल ४३ गावांना शांतता पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासोबत राजुरा उपविभागातील गोंडपिपरी, धाबा, लाठी, कोठारी, विरूर, गडचांदूर उपविभागातील गडचांदूर, पाटण, पिट्टीगुडा, भारी, टेकामांडवा आदी पोलीस ठाणे संपूर्ण तंटामुक्त घोषित करण्यात आली आहेत.
२७५ गावांना शांतता पुरस्काराची प्रतीक्षा
By admin | Published: January 09, 2017 12:41 AM