चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन केले. त्यामुळे पहिली ते नवव्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी परीक्षा न देताच पास झाले. दरम्यान, पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या २८ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी तर ना शाळा बघितली, ना शिक्षक एवढेच नाही तर वर्गमित्रही नाही. असे असले तरी ते आता दुसऱ्या वर्गात जाणार आहे. शैक्षणिक वर्षातील पहिली पायरीच यामुळे डगमगली असून त्यांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार, याची चिंता आता पालकांना सतावत आहे.
कोरोनामुळे प्रत्येकांच्या आयुष्यात वेगळे वळण आले आहे. परिणामी वेगळ्या अनुभवांनाही सामोरे जावे लागत आहे. कधी नव्हे ते यावर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम करावा लागला. यामध्ये पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना साधी शब्दांची ओळखही नसतानाही ऑनलाईन अभ्यासक्रमांत गुंतावे लागले. शाळा, वर्गमित्र, शिक्षक यातून बाराखडी, अक्षरांची ओळख, शाळेचे वातावरण या सर्वांपासून पहिल्या वर्गातील विद्यार्थी यावर्षी मुकले. एकही दिवस शाळेत न जाता आता ते दुसऱ्या वर्गात जाणार आहे. जिल्ह्यात मागील वर्षी २८ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. यातीच आरटीई अंतर्गत सर्वच्या सर्व विद्यार्थी परीक्षा न देताच पास होणार आहे. मात्र यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, शहरी भागातील काही पालकांनी विद्यार्थ्याचा अभ्यास घेतला असला तरी ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या वर्गातील शैक्षणिक पाया मजबूत न झाल्यामुळे पुढील वर्गातील अभ्यासक्रम ते पूर्ण कसे करतील, अशी चिंता आता पालकांना लागली आहे.
बाॅक्स
अक्षरओळख नाही
इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना अक्षराची ओळख करून घेतली. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनीही मोठे प्रयत्न केले. मात्र ग्रामीण भागात ऑनलाईन प्रयोग फारसा उपयोगी पडला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना अक्षरओळखही झाली नाही. अशावेळी ते दुसऱ्या वर्गात जाणार आहे.
बाॅक्स
शिक्षकांना होणार त्रास
अभ्यासक्रम पूर्ण न करताच दुसऱ्या वर्गात विद्यार्थी गेले आहे. त्यामुळे दुसऱ्या वर्गाचा अभ्यासक्रम सुरु झाल्यास या विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवतील कसे हा प्रश्न आहे. या शिक्षकांना प्रथम पहिल्या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या वर्गाचा अभ्यासक्रम सुरु करावा लागणार आहे. यासाठी शिक्षकांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागणार आहे.
बाॅक्स
पहिल्या वर्गातील मजाच वेगळी
पहिल्या वर्गात विद्यार्थ्यांना टाकल्यानंतर काही विद्यार्थी खुशीखुशीने शाळेत जातात. मात्र काहींना सवयच नसते. शाळेच्या पहिल्या दिवसामध्ये आईवडिलांना घट्ट पकडून असतात. रडतात, एवढेच नाही तर काही जण वर्गातच डुलकीही घेतात. छोट्या-छोड्या गमती-जमती शिक्षकांकडून सांगितल्या जातात. नवीन स्कूल ड्रेस, नवीन पुस्तक, दप्तर या सर्वाना हे विद्यार्थी मुकले आहे.