परिमल डोहणे, चंद्रपूर : अंडाशयाच्या डाव्या बाजूला असलेल्या गाठीमुळे पोटदुखीने त्रस्त असलेल्या महिलेवर चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी तब्बल अडीच तास अत्यंत गुंतागुंतीची असलेली यशस्वी शस्त्रक्रिया करून साडेतीन किलोची अंडाशयाची गाठ काढली. त्यामुळे त्या महिलेची पोटदुखीपासून मुक्ती झाली आहे.
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात एक ४५ वर्षीय महिला पोटदुखीच्या त्रासाने उपचारासाठी आल्या होत्या. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. प्रीती बांबोळे यांनी त्यांची तपासणी केली असता, गोळा असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी त्या महिलेला सोनोग्राफी व सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर अंडाशयाच्या डाव्या बाजूला 20 बाय 20 सीएमची गाठ असल्याचे निदान झाले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रीती बांबोळे यांनी त्या महिलेला शस्त्रक्रिया करून अंडाशयाची ती गाठ काढावी लागते, असे सांगून शस्त्रक्रियेची तयारी सुरू केली.
दरम्यान, शुक्रवार दि. २२ मार्च रोजी त्या महिलेवर डॉ. प्रीती बांबोळे, डॉ. श्रीलता, डॉ. अर्चना तलांडे या तीन स्त्रीरोगतज्ज्ञांनी तसेच ॲनेस्थेलॉजिस्ट डॉ. प्रशांती, डॉ. प्रशांत यांनी मिळून अत्यंत गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे त्या महिलेची पोटदुखीपासून मुक्ती झाली आहे.
‘त्या’ महिलेच्या अंडाशयाच्या डाव्या बाजूला 20 बाय 20 सीएमची गाठ असल्याचे निदान सोनोग्राफीतून झाले होते. या गाठीमुळे त्या महिलेला पाळीसुद्धा नीट येत नव्हती. त्यामुळे ती गाठ आणि गर्भाशय काढणे गरजेचे होते. याबाबत त्या महिलेला पूर्ण सविस्तर माहिती देऊन आमच्या सहकारी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मदतीने ती गाठ व गर्भाशय काढण्यात आले. आता त्या महिलेचे पोट दुखणे बंद झाले असून तिची प्रकृतीही सुव्यवस्थित आहे. -डॉ. प्रीती बांबोळे, स्त्रीरोगतज्ज्ञ, चंद्रपूर