अरुण कुमार सहाय
चंद्रपूर : स्वित्झरलँडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत उद्योग लावण्यासंदर्भात करार करणाऱ्या कंपन्या महाराष्ट्राच्या असतानाही सरकारने या विदेशी कंपन्या असल्याचे सांगून संभ्रम निर्माण केला होता. ‘लोकमत’ने या कंपन्यांचा बोगसपणा उघडकीस आणला होता. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही ही बाब मान्य करीत, या कंपन्या महाराष्ट्रातीलच असल्याचे त्यांनी मान्य केले.
दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्राच्याच
मात्र, ते म्हणाले की, विदेशी गुंतवणूक आणण्यासाठी सरकारने हा करार केला होता. परंतु देशी कंपन्यांना विदेशी दाखविण्याची गरज का पडली? हे त्यांनी स्पष्ट केले नाही. सामंत यांनी रविवारी रत्नागिरीहून सोशल मीडिया लाइव्हद्वारे याचे स्पष्टीकरण दिले. याप्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळावर बोट ठेवले. ते म्हणाले की, ठाकरे सरकारच्या काळात त्यांनी काही केले नाही. आता ते आरोप लावत आहेत. त्यांनी स्पष्ट करावे की अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी किती कंपन्यांशी करार केला होता.