चंद्रपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर बससेवासुद्धा बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत अनलाॅक झाले असले तरी ७० टक्केच बस रस्त्याने धावत आहेत. परिणामी ग्रामीण प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, वरोरा, चिमूर आणि राजुरा हे आगार येतात. या आगारातून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत बसेस चालविल्या जातात. मात्र, लाॅकडाऊन झाल्यानंतर बस बंद करण्यात आल्या. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर नागपूर तसेच लांब पल्ल्याच्या अन्य बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र, आजही ग्रामीण भागात एसटी पोहोचली नसून येथील नागरिकांनी काळीपिवळी, ऑटो तसेच दुचाकीने शहरात यावे लागत आहे. यामध्ये त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. चंद्रपूर विभागामध्ये २४५ बसेस असून, १ हजार ५०५ कर्मचारी आहे. मात्र, सद्यस्थितीत ७० टक्केच बसेस चालविल्या जात आहेत.
बाॅक्स
एकूण बस - २४५
एकूण कर्मचारी-१,५०५
सध्या सुरू असलेल्या बस-१७०
चालक-५८२
वाहक-३६८
सध्या कामावर चालक-४८०
सध्या कामावर वाहक-२५६
बाॅक्स
या गावांना बस कधी
राजुरा तालुक्यातील गोवरी, मानोली, बाबापूर, कढोली, साखरी, पवनी, मार्डा आदी, कोरपना तालुक्यात मांगलहिरा, येरगवान, कोडशी, चंद्रपूर - कोरपना (भोयेगाव मार्गे), जिवती तालुक्यातील गडचांदूर - जिवती येलापूर ही बस बंद आहे. राजुरा - गडचांदूर - शेणगाव, भारी, बाबापूर, राजुरा - पुडियालमोहदा, राजुरा - गडचांदूर, शेणगाव - टेकामांडवा, नागभीड तालुक्यात नागभीड - बाळापूर, नागभीड मौशी आदी बस फेऱ्या बंद आहेत.
बाॅक्स
प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार
औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे रोजगारासाठी इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येथे नागरिक येतात. मात्र, लाॅकडाऊननंतर बऱ्याच गावातील बस अद्याप बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषत: नागपूर तसेच इतर काही मोठ्या शहरांसाठी ट्रॅव्हल्स आहेत. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना जाण्यासाठी काळीपिवळी, ग्रामीण ऑटोंचाच आधार आहे.
बाॅक्स
काय म्हणतात प्रवास करणारे
कोट
लाॅकडाऊननंतर अनेक गावातील बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना शहरात येण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त पैसा मोजावा लागत आहे. सध्या अनलाॅक असल्यामुळे नागरिक खरेदी तसेच इतर कामांसाठी शहरात येतात. मात्र, प्रवास करणे कठीण झाले आहे.
विजय ठाकरे, प्रवासी
कोट
लाॅकडऊनमुळे बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. काही गावांतील बस सुरू झाल्या आहेत. मात्र, आजही अनेक गावांतील बस सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामंडळाने पूर्वीप्रमाणे सर्व बसफेऱ्या सुरू कराव्या.
- रमेश कोडापे, चंद्रपूर