चंद्रपूर : शासनाने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी काही निकष ठरवून दिले आहेत. यानुसारच त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, जिल्ह्यातील काही नागरिक शासकीय निकषांना बगल देत सुविधा प्राप्त करून घेत आहेत. असाच प्रकार रेशन उचलण्यामध्येही होत असून, घरात टीव्ही, फ्रीज, दुचाकी एवढेच काय चार चाकी वाहन असतानाही अनेक जण रेशन दुकानातून धान्य उचलत आहेत. सद्यस्थितीत पुरवठा विभागाकडील आकडेवारीनुसार १ लाख ३७ हजार १९५ नागरिक दारिद्र्यरेषेखाली आहेत. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना त्रास होऊ नये, इतर नागरिकांच्या तुलनेमध्ये त्यांनाही सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी शासनाने काही निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार त्यांना धान्य तसेच इतर सुविधा प्राप्त करून दिल्या जातात. मात्र, याकडेही काही श्रीमंतांची नजर असून, त्यांच्या वाट्यातील लाभ हेच लोक घेत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने दारिद्र्यरेषेखाली असलेले नागरिक वंचित राहात आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने दारिद्र्यरेषेखालील विशेषत: अंत्योदय लाभार्थ्यांची यादी तयार करून खऱ्या लाभार्थ्यांना रेशन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील लोकसंख्या- २२,०४,३०७
एकूण रेशनकार्डधारक- ४,५८,८५०
दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक- १,३७,१९५
बाॅक्स
कोणत्या तालुक्यात किती दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक
बल्लारपूर ७,४१९
भद्रावती ८,५२३
ब्रह्मपुरी १०,१४१
चंद्रपूर ५,६१९
चंद्रपूर शहर ७,३३७
चिमूर १०,२७२
गोंडपिपरी ९,०८७
जिवती १३,०३३
कोरपना ६,९४१
मूल ८,१७०
नागभीड ९,३३२
पोंभुर्णा ७,२२६
राजुरा ९,४७४
सावली ६,४४६
सिंदेवाही ८,२९२
वरोरा ९,८८३
एकूण १,३७,१९५
बाॅक्स
दारिद्र्यरेषेसाठीचे निकष काय?
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. अशांचा दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी म्हणून उल्लेख केला जातो.
कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय कर, विक्रीकर किंवा आयकर भरत नसावी किंवा भरण्यास पात्र नसावी. कुटुंबाकडे निवासी दूरध्वनी नसावा, कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे, दोन हेक्टर जिरायत जमीन नसावी.
बाॅक्स
यादीत गोंधळ कारण......
जेव्हा-जेव्हा तपासणी कार्यक्रम आखला जातो. तेव्हा कधी शासकीय, तर कधी स्थानिक कारणांमुळे अडथळा येतो. त्यामुळे या कार्डची प्रत्यक्षरित्या शहानिशा होत नाही. परिणामी निकषात बसत नसतानाही अनेकांना लाभ मिळत आहे.
बाॅक्स
दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावाच घेतला गेला नाही
जिल्ह्यात ३० टक्के नागरिक दारिद्र्यरेषेखालील असल्याचे अंत्योदय कार्डवरून दिसून येते. मात्र, अनेकांकडे निकष सोडून टीव्ही, फ्रीज एवढेच काय तर चारचाकी वाहनेसुद्धा आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने दारिद्र्यरेषेखालील लोकांना लाभ न मिळता दुसरेच लाभ घेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
बाॅक्स
कोण गरीब, कोण श्रीमंत, तीन लाखांवर लोकांना मोफत रेशन
जिल्ह्यात १ लाख ३७ हजार १९५ नागरिकांना अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य दिले जाते. मात्र, यातील अनेकांकडे सोयी-सुविधा आहेत. प्राधान्य गटातील २ लाख ६२ हजार ३०० लाभार्थ्यांना धान्य दिले जाते. त्यामुळे आता कोण गरीब, कोण श्रीमंत हा भेदभाव राहिला नाही. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील प्रत्येकजण धान्य उचल करीत आहे.