लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील ५५० वर्ष प्राचीन गोंडकालीन किल्ल्याची झालेली दुरवस्था व परकोटावर वाढलेला कचरा स्वच्छतेसाठी चंद्रपुरातील इको-प्रो संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे स्वच्छता अभियान सुरू असून बुधवारी या अभियानाला ३०० दिवस पूर्ण झाले.ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्याची साफ-सफाई व्हावी, नागरिकामधे जन-जागृती व्हावी याकरिता इको-प्रो संस्थेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत १ मार्च २०१७ पासून चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुरु केले होते. या अभियानामध्ये दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत श्रमदान करुन साफसफाई केली जात आहे.आतापर्यंत या अभियानात चंद्रपूर किल्ला परकोटचे ४ दरवाजे, ५ खिडक्या, ३९ बुरुज पैकी २९ बुरुज स्वच्छ करण्यात आले आहे. एकूण किल्लाच्या भिंतीपैकी ७० टक्के भिंती आणि या किल्लावरुन पायदळ चालण्याचा मार्ग स्वच्छ करण्यात आला आहे. किल्लाच्या काही भाग ‘हेरिटेज वाक’ ऐतिहासिक सहलीच्या दृष्टीने तयार करण्यात येत आहे. जेणेकरून येणाऱ्या पर्यटक आणि विद्यार्थ्यांना गोंडकालीन इतिहास आणि वास्तुची माहिती देता येईल.
‘मन की बात’ मध्ये गौरवया अभियानास २०० दिवस पूर्ण झाले असताना २९ आॅक्टो २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन कि बात’ या कार्यक्रमात चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत इको-प्रो संस्थेच्या कार्याचे व चंद्रपुरकरांचे कौतुक केले होते. ऐतिहासिक वारसा संवर्धनाच्या दृष्टीने सुद्धा या अभियानाचे पंतप्रधानांनी महत्त्व विषद केले.