चंद्रपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रतिबंधक उपाययोजना व लसीकरणही सुरू आहे. मात्र, नागरिकांची बेफिकिरी दूर झाली नाही. त्यामुळे राज्य सरकारने आता लोककलावंतांकडून शहर व ग्रामीण भागात कोरोनाविरुद्ध जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. सांस्कृतिक कार्य संचालनालय हे जिल्हा माहिती कार्यालयाच्या मदतीने जिल्ह्यात सुमारे ३०० प्रयोगात्मक लोककलावंतांची निवड करणार असून, मानधनासाठी १३ लाख ५० हजारांची तरतूदही केली आहे.
जिल्ह्यात रविवारपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७७ हजार ५७५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या ६६ हजार २२६ झाली, ही दिलासा देणारी बाब आहे. मात्र, संसर्गाचा आलेख घसरला नाही. जिल्हाभरात १० हजार ९७ अॅक्टिव्ह रुग्ण व आतापर्यंतच्या १,२५२ मृतांची संख्या भयानकताच दर्शविणारी आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सुरू आहेत. सीसीसी, डीसीएच व डीसीएचसी रुग्णालयांची संख्या वाढली. ऑक्सिजनयुक्त कोविड हॉस्पिटल्स उभारण्याचे कामही सुरू आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेचीही चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर कोविड संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागावरचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आरोग्य जनजागृतीवर भर देण्यासाठी प्रयोगात्मक लोककलांवतांची मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात सुमारे ३०० लोककलावंतांची निवड केली जाणार आहे. या कलावंतांच्या माध्यमातून आरोग्याची खबरदारी, कोविड-१९ नियमावली, लसीकरण व शासनाच्या धोरणात्मक उपाययोजनांची माहिती गावागावांत पोहोचविण्याचे कार्य सुरू केले जाणार आहे.
अशी होईल कलावंतांंची निवड
आरोग्य जागृती कार्यक्रमासाठी संचालक, राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई हे माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या मदतीने कलावंतांची निवड करतील. याकरिता जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. निवड झालेल्या कलावंतांच्या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करतील. या कार्यक्रमाचे सनियंत्रण जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीकडून होईल. जिल्हा माहिती अधिकारी हे समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील.
असे आहे मानधनाचे स्वरूप
ग्रामीण भागात एकल व समूहस्तरावर कार्यक्रम सादर झाल्यानंतर कलावंतांना मुख्याध्यापक, ग्रामसेवक अथवा तलाठी तर शहरी भागात प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून कार्यक्रम केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारावरच मानधनाचे मागणीपत्र मंजूर होईल. एकल कलाकाराला दरदिवशी ५०० रुपये व किमान सात सादरीकरण, दोन किंवा तीन कलाकारांच्या समूहाला चार सादरीकरण व प्रत्येकाला ५०० रुपये मानधन मिळेल. समूहाला एका दिवशी दहा कार्यक्रम बंधनकारक आहे.