भेजगाव (चंद्रपूर) : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून विजेचे तांडव सुरू आहे. भाताची रोवणी करायला वेग आला आहे. गुरुवारी रोवणीकरिता जाणाऱ्या महिला मजूरांवर वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर बुधवारी सायंकाळी मूल तालुक्यातील बेंबाळ शेतशिवारात तीन ठिकाणी वीज पडल्याने ३१ महिला गंभीर जखमी झाल्या.
विजेच्या कडकडाटासह बुधवारी सायंकाळच्या सुमारास बेंबाळ शेतशिवारात पाऊस आला. यात वीज कोसळल्याने ३१ महिला मजूर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय मूल येथे उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वर कत्तुलवार यांच्या शेतात रोवणीचे काम करणाऱ्या १४, तर नत्थुजी उरांडे यांच्या शेतात काम करणाऱ्या १० व सुनील पेटकुले यांच्या शेतात काम करणाऱ्या ७ मजुरांवर बुधवारी सायंकाळच्या सुमारास थंडी वीज कोसळली. मजुरांना तेव्हा काहीही जाणवले नाही. मात्र, गुरुवारी सकाळी सर्वच मजुरांचे हात-पाय वाकडे, तर काहींना अशक्तपणा तर काहींना अंधुक दिसणे, अशी लक्षणे जाणवू लागल्याने सर्व जण आरोग्य केंद्रात गेले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय मूल येथे रेफर करण्यात आले.
वीज कोसळून महिलेचा मृत्यू
शेतातील रोवणीचे काम आटोपून घर जवळ करताना एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. दुसरी महिला गंभीर जखमी झाली. विमल लक्ष्मण पिसे (वय ७०) असे मृत महिलेचे, तर गीता प्रकाश पिसे (५५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. चिमूर तालुक्यातील नेरीजवळील मोखाळा शेतशिवारात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता अचानक विजेचा कडकडाट झाला आणि वीज कोसळली.
बैलजोडी ठार
सावली तालुक्यातील बोरमाळा येथे गुरुवारी दुपारी घराच्या अंगणात बांधून असलेल्या बैलजोडीवर वीज पडून बैलजोडीचा मृत्यू झाला. संतोष होनाजी नन्नावरे, रा. बोरमाळा, असे बैलजोडी मालकाचे नाव आहे.