नागभीड : तालुक्यात ३१५ शेतकरी कृषी विहिरींवर वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज जोडणीच्या निविदा न निघाल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याची माहिती आहे.
नागभीड तालुक्यात सिंचनाची कोणतीही सोय नाही. येथील शेतकरी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत. यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यातील शेतकरी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विहिरींच्या विविध योजनांचा लाभ घेत असून, या विहिरींच्या माध्यमातून शेतीला ओलीत करीत आहेत. २००० ते मार्च २०१८ पर्यंत या तालुक्यातील जवळपास २ हजार २०३ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
मात्र, मार्च २०१८ नंतर विद्युत मंडळाने वीज जोडण्या देण्याबाबत हात आखडता घेतला आहे. त्याऐवजी सौर ऊर्जा संच देण्याकडे शासनाचा कल होता. मात्र, सौर ऊर्जा संचास म्हणावा तेवढा प्रतिसाद न मिळाल्यामुळे परत वीज जोडणी देणे सुरू करण्यात आले. विश्वसनीय माहितीनुसार जवाहर विहीर योजना, जीवनधारा विहीर योजना, महाराष्ट्र ग्रामीण विहीर योजना, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना या योजनांमधील विहिरीच्या ३९१ शेतकऱ्यांनी विहिरीचे काम पूर्ण करून विद्युत मंडळाकडे वीज जोडणीसाठी अर्ज केले होते, अशी माहिती आहे.
३९१ लाभार्थ्यांपैकी चालू वर्षात केवळ ७६ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली. उर्वरित निविदा निघाल्यानंतरच जोडणी मिळणार असल्याचे संकेत आहेत. आता या निविदा केव्हा निघतात याकडे या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणाला आणि नापिकीला कंटाळून या तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांवर ही वेळ येऊ नये. या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी मिळाली तर ते आपल्या उत्पादनात निश्चितच भर घालू शकतात.