चंद्रपूर : सुगंधीत तंबाखूवर राज्य शासनाने बंदी घातली असतानाही चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुगंधीत तंबाखू विकला जात आहे. ही बाब लक्षात येताच चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्यासह चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालयाच्या परिसरातील धनलक्ष्मी अपार्टमेंटमधील एका सदनिकेवर अचानक धाड घातली. यामध्ये तब्बल ३२ लाखांचा सुगंधीत तंबाखू व पान मसाल्याचा साठाच आढळला. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली. मे. जया ट्रेडींग कंपनीचा हा तंबाखू असल्याची बाब तपासात निष्पन्न झाली आहे.
यामध्ये सिग्नेचर पान मसाला ५२८३ नग, वजन ७१८.४८८ किलोग्रॅम, किंमत १७ लाख ९६ हजार २२० रुपये, ओरीजिनल गोल्ड सुगंधीत तंबाखू १३६४ नग, वजन २७२.८ किलोग्रॅम, किंमत १३ लाख ५० हजार ३६०, रेस गोल्ड सुगंधीत तंबाखू ५६ नग, वजन २५.२ किलोग्रॅम, किंमत ११ हजार २०० रुपये असा एकूण ३१ लाख ५७ हजार ७८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन कार्यालय, चंद्रपूरने २०२०-२१ वर्षात ३९ कारवाया केल्या. यामध्ये ९८ लाख ३४ हजार ३६३ रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त केला आहे.