कोठारी पोलिसांचा कारनामा : जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रारगोंडपिपरी : मुलाच्या हाताने अपघात झाला. अपघातात एक किरकोळ जखमी झाला. दुसरीकडे अपघात करणाऱ्यांवर नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पण या साऱ्या भानगडीत कोठारीच्या एका पोलीस शिपायाने अपघात करणाऱ्याच्या कुटुंबीयांकडून तब्बल ३२ हजार रुपये उकळले. सहा महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला तेव्हापासून पैसे परत मिळविण्यासाठी पळसगाव येथील वाघु निकोडे यांची धावपळ सुरू आहे. याप्रकरणाची पोलीस अधिक्षकांकडेही तक्रार देण्यात आली आहे.बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील वाघु निकोडे यांनी पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी महिन्यात वाघू यांचा मुलगा प्रफुल्ल निकोडे यांच्या दुचाकीने अपघात झाला. यात एक इसम जखमी झाला. या घटनेनंतर कोठारी पोलीस ठाण्यामधील शंकर आत्राम हे पोलीस चौकशीसाठी आले. यानंतर आत्राम यांनी प्रफुल्ल व वाघु या बापलेकांना ठाण्यात नेले. घटनेची माहिती कळताच, वाघुचा जावई ठाण्यात पोहचला. अशातच आत्राम यांनी प्रफुल्ल व जावयाला अटक केली आणि वाघुला हाकलून दिले. वाघु पोलीस ठाण्याच्या बाहेर पडताच पोलीस शिपाई आत्राम त्यांच्या मागे आले व त्यांना आपल्या गाडीवर बसवून पैशाची मागणी केली. वाघुजवळ पैसे नसल्याने नातेवाईकांकडून उसणवारीने पैसे घेऊन ते द्यायला तयार झाला. त्यानंतर वाघुने कोठारी येथील सुरेश वाटघुरे यांच्याकडून २० हजार रुपये घेतले. त्यांपैकी १८ हजार रुपये आत्रामने ठेवले. यानंतरही मुलगा प्रफुल्ल व जावयाकडून १४ हजार ७०० रुपये वसुल केले. असे एकुण ३२ हजार सातशे रुपये शंकर आत्राम यांनी या प्रकरणात घेतले. या प्रकरणाची वाच्यता कुणाकडे करू नकोस. नाहीतर बघून घेण्याची धमकीही आत्राम यांनी दिली. पोलिसांनी नियमानुसार गुन्हा नोंद केल्यानंतरही आत्राम यांनी ३२ हजार ७०० रुपये वसुल केल्याने आपली मोठी आर्थिक लुट झाल्याचे वाघुच्या लक्षात आले. या घटनेनंतर वारंवार विनंती करूनही पैसे परत न मिळाल्याने वाघु निकोडे यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करून न्यायाची मागणी केली. वाघु निकोडे हा मजुरीचे काम करतो. अशा सामान्य मजुराकडून पैसे उकळणाऱ्या पोलिसांवर अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही. आत्राम यांनी आपणाकडून उकळलेले ३२ हजार ७०० रुपये परत मिळावे, यासाठी वाघु गेल्या अनेक दिवसांपासून धडपड करीत आहे. (शहर प्रतिनिधी)आंदोलनाचा इशारागेल्या काही महिन्यांपासून वाघु आपले पैसे परत मिळविण्यासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवित आहे. पण अद्यापही त्याचे पैसे त्याला मिळाले नाहीत. त्याने पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करून स्वत:वरील अन्यायाला वाचा फोडली. पण अद्यापही न्याय न मिळाल्याने वाघुने कोठारी पोलीस ठाण्यासमोर आपण कुटुंबासह आंदोलन करू, असा इशारा वाघुने दिला आहे.
अपघात करणाऱ्या युवकाकडून उकळले ३२ हजार रुपये
By admin | Published: June 11, 2016 1:09 AM