लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तब्बल सहा महिन्यानंतर गुरूवारी पर्यटकांसाठी खुले झाले. ताडोबा प्रकल्पात पहिल्याच दिवशी ३२० पर्यटकांनी जंगल भ्रमंती केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती ताडोबा व्याघ्र प्रकल्प संचालयाने दिली.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पहिल्या दिवशी खुल्या जिप्सी वाहनात एक वाहनचालक, एक मार्गदर्शक आणि चार पर्यटकांना प्रवेश देण्यात आला. १० वर्षांखालील व ६५ वर्षांवरील व्यक्ती व गर्भवती स्त्रियांना पर्यटनासाठी प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. प्रवेश देण्यापूर्वी सर्व पर्यटक, जिप्सी चालक, मार्गदर्शकांच्या शरिराचे तापमान तपासण्यात आले. जंगल भ्रमंती करताना प्रत्येक पर्यटकाला मास्क लावणे बंधनकारक होते. पर्यटन प्रवेशद्वारावर जिप्सीचे टायर निजंर्तूक करण्याची सुविधा तयार करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन, केंद्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना पर्यटकांना देण्यात आल्या. पर्यटकांना संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.कोरोनामुळे सहा महिन्यांपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प भ्रमंतीसाठी बंद ठेवण्यात आला होता. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व राज्याच्या वन्यजीव विभागाकडून परवानगी मिळाल्याने पर्यटकांसाठी ताडोबाचे प्रवेशद्वार उघडण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांनी ३२० पर्यटकांनी जंगल भ्रमंती केली.-डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक ताडोबा व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर