भेजगाव : मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिरोली पोलीस चौकीत चारच पोलीस कर्मचारी ३४ गावांची जबाबदारी सांभाळत आहे. यामुळे कामात अडचणी निर्माण होऊन गुन्ह्यातील तपास संथ गतीने होत आहे. यातून पोलीस यंत्रणा ढेपाळल्याचे चित्र आहे.गतवर्षी नागरिकांची वाढती मागणी व गावांची संख्या लक्षात घेवून प्रशासनाने चिरोली येथे नवीन पोलीस चौकीची निर्मिती केली. या नवनिर्मित पोलीस चौकीचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०१४ ला तत्कालीन पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या हस्ते करण्यात आले.चिरोली येथे पोलीस चौकीची निर्मिती झाल्याने परिसरातील नागरिक सुखावले. यावेळी उद्घाटनाप्रसंगी महिनाभरातच आवश्यक तेवढे पोलीस कर्मचारी नेमण्याची ग्वाही राजीव जैन यांनी दिली. मात्र वर्षभराचा कालावधी लोटत असतानासुद्धा पोलीस कर्मचाऱ्यात वाढ झाली नाही. आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण वाढल्याचे चित्र आहे.परिणामी चार कर्मचारी ३४ गावांवर नियंत्रण मिळविण्यास अपयशी ठरत आहेत. त्यामुळे परिसरात गुन्ह्यात वाढ झाली आहे. या पोलीस चौकीअंतर्गत चिरोली, डोनी, गांगलवाडी, नंदगूर, भगवानपूर, मंदातुकुम, केळझर, सुशी, कांतापेठ, उथळपेठ, खालवसपेठ, जानाळा, टोलेबाही, नलेश्वर चिंचाळा, ताडाळा, हळदी, भेजगाव, सिंतळ, येरगाव, पिपरी दिक्षीत, दहेगाव, मानकापूर, दाबगाव, चकघोसरी आदी गावांसह ३४ गावांचा समावेश आहे. शासनाने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. तरीही अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. या अवैध दारू विक्री प्रकरणांमुळेही चौकीतील कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन कर्मचाऱ्यांची चौकीत नियुक्ती करावी. (वार्ताहर)
३४ गावांचा कारभार चार पोलिसांवर
By admin | Published: December 01, 2015 5:25 AM