पाण्याची गळती : निकृष्टपणे केलेली अख्खी पिचिंग उखडलीदुर्गापूर : चोरगावात ३५ लाख रुपये खर्चून लघुसिंचन विभागाद्वारे बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून पाण्याची गळती सुरू असून अख्खे पिचिंग उखडले आहे. या सदोष व निकृष्ट दर्जाच्या बंधाऱ्यामुळे भरघोस उत्पादन घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या येथील शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.चोरगाव हा अतिदुर्गम भाग आहे. हे गाव दुर्गापूरपासून १५ ते १६ कि.मी. अंतरावर असून जंगलाच्या मध्यभागी वसलेले आहे. ग्रामस्थ शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. शेती पावसावर अवलंबून आहे. उभी पिके अपुऱ्या पाण्यामुळे करपून जातात. त्यामुळे दारिद्र्यामध्ये जीवन जगत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांच्या या दुर्दशेची दखल घेत शासनाने लघुसिंचन योजनाद्वारे जंगलातून वाहन येणाऱ्या नाल्यावर पाणी अडविण्याकरिता १५ लाख रुपये खर्चून नुकताच कोल्हापुरी बंधारा बांधला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु तेथे केवळ नाममात्र पाणी असून ते गळतीद्वारे वाहून जात आहे.उन्हाळा लागायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हिवाळ्यातच या बंधाऱ्यातील पाण्याची बिकट अवस्था आहे. उन्हाळ्यात तर येथे पाण्याचा थेंबही साचून राहील की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. सदर बंधाऱ्याचे बांधकाम एवढे निकृष्ठ दर्जाचे झाले आहे की, बंधाऱ्याच्या बळकटी पावसाच्या नाल्याच्या दोन्ही काठाची माती खचून बंधाऱ्याची तुटफुट होऊ नये, याकरिता दोन्ही काठाने बंधाऱ्याच्या मागच्या व पुढच्या बाजूने दगडाची पिचिंग करण्यात आली आहे. याशिवाय तळाशीही तशीच पिचिंग केलेली आहे. ही अख्खी पिचिंग उखडून खिळखिळी झाली आहे. सदोष व निकृष्ठ बांधकाम करून शेतकऱ्यांशी खेळ करण्याऱ्या कंत्राटदार व लघुसिंचन विभागाचे अभियंते व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)
३५ लाखांचे कोल्हापुरी बंधारे निकृष्ट दर्जाचे
By admin | Published: January 15, 2017 12:45 AM