राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने (डीआयईसीपीडी) चंद्रपूर जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १ हजार ६१४ शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाच्या अध्ययनस्तराची जुलै २००८ मध्ये चाचणी घेण्यात आली होती. यानुसार ३५.६१ टक्के विद्यार्थ्यांना मराठी उताऱ्याचे वाचनच करता येत नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी म्हणून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) मागील चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. अध्यापन, अध्ययन, बदलते अभ्यासक्रम आणि ज्ञान संरचनावादी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता व बौद्धीक दर्जा तपासणीचे अनेक प्रयोग सुरू आहेत. संस्थेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १ हजार ६१४ शाळांमधील १ लाख ७ हजार ५२८ विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. यापैकी ९८.९० टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले होते. भाषा विषयात उतारा वाचन, स्वरचिन्हांसह शब्दवाचन, स्वरचिन्ह विरहित शब्दवाचन तसेच प्रारंभिक असे चार स्तर करण्यात आले. यानुसार दुसरी ते चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ६४.३९ टक्के विद्यार्थ्यांना उताऱ्याचे वाचन करता आले. जिवती व पोंभुर्णा तालुका सर्वात मागे असून ब्रह्मपुरी (६४.४६) व मूल (७२.०३), तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आघाडी घेतल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. जिवती ३६.३६ टक्के व पोंभुर्णा तालुक्यातील ५०.०७ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचन करता आले. सावली, बल्लारपूर, राजुरा, कोरपना तालुक्याची टक्केवारी ५१ ते ६० दरम्यान आहे. चंद्रपूर, गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, वरोरा, भद्रावती तालुक्याची टक्केवारी ६१ ते ७० आहे. मागील वर्षाच्या मराठी भाषा उतारा वाचनाची टक्केवारी ८२.५६ होती. यंदाच्या शैक्षणिक सत्रात ६४.३९ टक्के आढळली. तुलनात्मकदृष्ट्या ही तफावत १८.१७ टक्के आहे. त्यामुळे मागील वर्षी उतारा वाचन करण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १८.१७ टक्के विद्यार्थी मागे कसे पडले, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
शिक्षकांनीच घेतली चाचणीच्संस्थेच्या निर्देशानुसार चाचणी घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य वर्गशिक्षकांनाच दिले होते. मात्र, मराठी विषयाच्या वाचनात ३५.६१ टक्के विद्यार्थी मागे पडले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षकांवरच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
गणितातही पिछाडीच्गणित विषयाची सहा स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली. गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज, संख्याज्ञान या टप्प्यांमध्ये भागाकार हा पहिला टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, इयत्ता चौथी ते आठवीतील ३६.८५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकारच करता येत नसल्याचे चाचणीतून उघड झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १९.७६ टक्क्यांची तफावत आहे.