विकासाचा मार्ग सुकर : तीन विधानसभा क्षेत्रातील गावांचा समावेश चिमूर : तंत्रज्ञानामुळे जगाचे अंतर कमी होऊन गावागावाचे अंतर कमी झाले आहे. देशाच्या विकासामध्ये दळणवळणाचे खूप मोठे महत्त्व असते. मात्र स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षापासूनही चिमूर क्रांती नगरीचा परिसर राष्ट्रीय महामार्गापासून वंचित होता; मात्र आता उमरेड-चिमूर -वरोरा या शंभर किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाली असून उमरेड ते चिमूर या मार्गाचे सर्व्हेक्षण व कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. या राष्ट्रीय महामार्गातून चिमूर-उमरेड व वरोरा-भद्रावती या तीन विधानसभा क्षेत्रातील ३५ गावे राष्ट्रीय महामार्गावर येणार आहेत.देशाच्या विकासामध्ये दळणवळण व्यवस्थेचे खूप मोठे महत्त्व आहे.चिमूर विधानसभा क्षेत्रातील अनेक गाव विकासापासून वंचित होते. चिमूर विधानसभा क्षेत्राच्या व्यापारासह रोजगार निर्मिती, शेती व्यवसायाला गती मिळाण्याकरिता या राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग होणार आहे.चिमूर-वरोरा-उमरेड या शंभर किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमध्ये चिमूर, उमरेड व वरोरा-भद्रावती या तीन विधानसभा क्षेत्रातील ३५ गावांना या राष्ट्रीय महामार्गावर येण्याचा मान मिळणार आहे. त्यामध्ये चिमूर विधानसभा क्षेत्रातील १६ गावे, उमरेड विधानसभा क्षेत्रातील आठ, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील ११ गावांचा समावेश राहणार आहे.उमरेड, चिमूर, वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा डिसेंबर महिण्यात काढण्यात आली आहे. त्यामध्ये उमरेड - चिमूर महामार्गासाठी २३.११ कोटी रुपये व चिमूर-वरोरासाठी ३६०.३८ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून या महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये उमरेड-भिसी - चिमूर- शेगाव - वरोरा या मार्गाच्या सर्व्हेक्षणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. या राष्ट्रीय महामार्गामुळे उमरेड, चिमूर, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील ३५ गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे. नव्या उद्योगांनाही चालणार मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)राष्ट्रीय महामार्गावर येणारी गावेचिमूर विधानसभा क्षेत्रातील चिचोली, टाका, भिसी, कन्हाळगाव, येरखेडा, खापरी, पिंपळनेरी, चिमूर, सोनेगाव (बेगडे), शेडेगाव, बंदर, खडसंगी, वहाणगाव, बोथली, खानगाव व गुजगव्हान.वरोरा-भद्रावती क्षेत्रातील राळेगाव, चारगाव (बुज.), चारगाव (खुर्द), भेंडाळा, शेगाव (बु), मेसा, सालोरी, खातोडा, परसोडा आनंदवन, वरोरा.उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, धुरखेडा, मंगरूळ, पायगी, चिचाळा, उखळी, सुखळी, सालेभट्टी.
३५ गावे येणार राष्ट्रीय महामार्गावर
By admin | Published: March 27, 2017 12:37 AM