फोटो
घनश्याम नवघडे
नागभीड : नागभीड पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमीची विविध १३८ कामे सुरू असून या १३८ कामांवर तीन हजार ५९२ मजूर काम करीत असल्याची माहिती आहे. सध्या शेतीची बहुतेक कामे बंद आहेत. या पार्श्वभूमीवर ही कामे कामगारांना दिलासा देत आहेत.
या तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धान पिकावर अवलंबून आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षात निसर्ग दाखवत असलेल्या अवकृपेने या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकºयांना रोजगार हमीच्या कामांचा आधार घ्यावा लागत आहे. तालुक्यात धान उत्पादक शेतकरी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत शेतीच्या कामात व्यस्त असतात. त्यानंतर मे महिन्यापर्यंत शेतीची कोणतीच कामे राहत नसल्याने आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी रोजगार हमीच्या कामांना पसंती देतात. सद्यस्थितीत नागभीड तालुक्यात रोजगार हमीची १३८ कामे सुरू असल्याची माहिती आहे. यात पांदण रस्त्याची पाच कामे सुरू असून एक हजार ९५६ मजूर काम करीत आहेत. वृक्ष लागवडची ११६ कामे असून ६८३ मजूर, बोडी खोलीकरणाच्या तीन कामांवर ८८७ मजूर आणि इतर १७ कामे सुरू असून या कामांवर ६६ मजूर काम करीत आहे.
बॉक्स
तालुक्यात मोठा उद्योग नाही
नागभीड तालुका उद्योगविरहित आहे. या तालुक्यात मोठेच नाही तर कोणतेच लहानसहान उद्योग नाहीत. नागभीड येथे एमआयडीसी स्थापना करण्यात आली आहे. या बाबीस आता ३० वर्षांच्यावर कालावधी झाला आहे. मात्र आजपर्यंत एकही मोठा किंवा छोटा उद्योग या ठिकाणी उभा झाला नाही. या ३० वर्षात भूखंड बुक करून ठेवण्याचेच उद्योग झाले आहेत. म्हणूनच शेतीची कामे आटोपली की या तालुक्यातील मजूर रोगगारासाठी दरवर्षी नागपूर,वर्धा या जिल्ह्यात आणि आंध्र, तेलंगणाच्या सीमावर्ती भागात स्थलांतर करीत असतात. स्थलांतराची ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे बोलल्या जात आहे.
कोट
ही कामे सुरू आहेतच. पण पंचायत समिती अंतर्गत अनेक कामे मंजूर करून ठेवण्यात आली आहेत. जशी जशी मजुरांकडून कामाची मागणी येईल, त्याप्रमाणे कामे उपलब्ध करून देण्यात येतील.
- प्रणाली खोचरे
गट विकास अधिकारी, पं.स.नागभीड.