चंद्रपूर : रामाळा तलावाच्या संरक्षणासाठी इको प्रोने सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाच्या गुरुवारी (दि. ४) ११ व्या दिवशी ३६ जणांनी स्वत:च्या रक्ताने लिहिलेले पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. ही पत्रे मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू व बंगाली भाषेत लिहिली आहेत.
शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रदूषित झाले. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी संवर्धन खनिज विकास निधीतून उपाययोजना करण्याची मागणी बंडू धोतरे यांनी केली. त्यासाठी रामाळा तलाव परिसरातच उपोषण सुरू केले. नागरिकांनी आज रक्ताने लिहिलेले पत्र जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे पाठविले. खासगी वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी स्वत:चे रक्त संकलित केले. साखळी उपोषणात धर्मेद्र लुनावत, नितीन रामटेके, राहुल कुचनकर, सचिन धोतरे, अमोल उत्तलवार, भारती शिंदे आदी सहभागी झाले होते. आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.