सिंदेवाही (चंद्रपूर) : शहरातील शिवाजी चौक येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या पोल्ट्री फार्मवर वन्यप्राण्यांनी हल्ला चढवित तब्बल ३७५ कोंबड्यांचा फडशा पाडला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यात पोल्ट्री फार्म मालकाचे मोठे नुकसान झालेले आहे. हे वन्यप्राणी नेमके कोणते, याबाबत आता वनविभाग तपास करीत आहेत.
शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील शिवाजी चौक परिसरात बबलू कुरेशी यांचे बाबू पोल्ट्री फार्म आहे. रविवारी सकाळच्या वेळेस पोल्ट्री फार्म उघडण्याकरिता ते आले असता शेकडो कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. बबलू कुरेशी यांनी लगेच ही माहिती वनविभाग व पोलिस विभागाला दिली. नंतर पोलिस उपनिरीक्षक हे आपल्या पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर व क्षेत्र सहायक दीपक हटवार यांनी पोल्ट्री फार्मची पूर्ण तपासणी केली.
पोल्ट्री फार्ममधील जवळपास ३७५ कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्यांना मानेवरच जखमा झालेल्या आहेत. त्यामुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांवर नेमका कोणत्या वन्यप्राण्यांनी हल्ला केला, हे सांगणे कठीण असल्याचे वनाधिकारी विशाल सालकर यांनी सांगितले. घटनेनंतर परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. लोनवाही परिसरातील प्रभाग-२ मधील एका बैलाला वाघाने शुक्रवारी ठार केले होते, हे विशेष.