सावली (चंद्रपूर ) : रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीवरील चार वर्षीय बालक व एक इसम जागीच ठार झाले. तर दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर गावाजवळ घडली. वरुण हरिदास बोरूले (४), उमेश श्रीरंग गुरनुले वय २७ वर्ष दोघेही रा. फराळा, ता चार्मोशी जि. गडचिरोली असे मृतकांचे नाव आहे. तर शेवंता रामदास कावळे (६५)रा नवेगाव, हरीदास बापुजी बोरुले (४०)रा. फराळा, ता. चार्मोशी असे जखमींचे नाव आहे.
उमेश गुरनुले हा दुचाकी क्रमांक एमएच ३३ एइ. १८३७ या गाडीने शेवंता, वरुण, हरीदास यांना घेऊन फराळा येथे जात होता. दरम्यान हिरापूर बसस्थानकाजवळ धोकादायक स्थितीत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेला ट्रक क्रमांक सी. जी. ०८ एएक्स ६१७१ ला जोरदार धडक दिली. यात वरून व उमेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर हरिदास व शेवंता हे गंभीररीत्या जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला. याबाबतची माहिती सावली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
तसेच फरार ट्रकचालकाला पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली. दरम्यान ट्रकचालकावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्यान्वये १०६ (०१), १२५ (ए), १२५ (बी), २८५ सहकलम १२२, १३४ ए, १३४ (ब) वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन ट्रकचालकाला ट्रकसह खेडी फाट्याजवळ अटक केली. जखमींवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही कारवाई सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन मुसळे, पोलिस हवालदार विनोद नीखाडे, स्वप्निल दुर्योधन, अशोक मडावी, संजय शुक्ला यांच्या पथकाने केली.