वाहतूक पोलिसांची कारवाई : दंड वसूल व दुचाकी जप्तचंद्रपूर : सुशोभित करण्यात आलेल्या रामाळा तलाव मार्गावर स्टंटबाजी करणे दुचाकीस्वारांना चांगलेच भोवले आहे. स्टंटबाजी करून इतर वाहनधारक व पादचाऱ्यांना त्रस्त करणाऱ्या ४० दुचाकीस्वारांवर पोलीस वाहतूक शाखेने कारवाई करून दंड वसूल व दुचाकी जप्त केल्या. त्यामुळे स्टंटबाज दुचाकीस्वारांत चांगलीच भिती पसरली आहे. स्वच्छ चंद्रपूर मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहरातील विविध मार्ग सुभोभित करण्यात आले आहेत. रामाळा तलाव परिसरातील रस्ते रात्रीच्या सुमारास पथदिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतात. या मार्गावर पादचारी व इतर वाहनधारकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात स्टंटबाज दुचाकीस्वारांनी उन्माद घातला आहे. विशिष्ट व मोठ्या आवाजाच्या बुलेट वाहनाद्वारे अनेक युवक वर्दळीच्या रस्त्यावर स्टंटबाजी करून इतरांना घाबरवत असतात. यामुळे अनेक नागरिकांनी वाहतूक शाखेकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. वाहतूक शाखेच्या विशेष पोलीस पथकाने रामाळा तलाव मार्गावर पाळत ठेवून ही कारवाई मागील तीन दिवसांत जवळपास ४० स्टंटबाज दुचाकीस्वारांना ताब्यात घेतले. यात काही जणांकडे परवाने नव्हते. त्यामुळे या स्टंटबाजांवर दंड व दुचाकी जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यापुढे युवकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)स्टंटबाज युवकांच्या उन्मादामुळे नागरिक त्रस्तलाखो रुपयांचा निधी खर्च करून चंद्र्रपूरकरांसाठी रामाळा तलावाची चौपाटी सुशोभित करण्यात आली आहे. ही चौपाटी पाहण्याकरिता शेकडो नागरिक सायंकाळच्या सुमारास येथे गर्दी करत असतात. मात्र काही दिवसांपासून रामाळा तलाव चौपाटीच्या सौंदर्यीकरणाला स्टंटबाजीचे ग्रहण लागले होते. या दुचाकीस्वारांच्या स्टंटमुळे येथे अपघाताची शक्यता बळावली होती. त्यामुळे काही नागरिकांनी वाहतूक शाखेकडे तक्रारी केल्या.चंद्रपुरात स्टंटबाजीचे प्रकार वाढले आहेत. अनेकांच्या याबाबत तक्रारी असून वाहतूक शाखेकडून मोहिम हाती घेऊन कारवाई केली जात आहे. स्टंटबाजी करून आपल्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नये. पार्किंगचे नियम सर्व वाहनधारकांनी पाळावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे. - अशोक कोळीपोलीस निरीक्षक,वाहतूक शाखा चंद्रपूर.
४० दुचाकीस्वारांना स्टंटबाजी भोवली
By admin | Published: March 25, 2017 12:43 AM