राजुरा : राजुरा तालुक्यात क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘तालुका तिथे क्रीडा संकुल’ ही संकल्पना डोळ्यापुढे ठेऊन राजुरासारख्या मागास तालुक्यात क्रीडा संकुल उभे करण्याची योजना तयार केली. मागील १० वर्षांपासून या क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झाले नाही. या क्रीडा संकुलाच्या इमारतीवर लाखो रुपये खर्च करण्यात आला. परंतु शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे राजुरा तालुक्याच्या ठिकाणी असलेले क्रीडा संकुल मागील अनेक वर्षांपासून धूळ खात पडले आहे. या तालुका क्रीडा संकुलामध्ये एक मोठी इमारत बांधण्यात आली. तेव्हापासून ती उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. या इमारतीमध्ये ठेकेदाराचे सर्व सामान ठेवण्यात आले आहे. या संकुलामध्ये काही व्यक्ती वास्तव्य करीत आहे. या क्रीडा संकुलात काही रस्ते तयार करण्यात आले आहेत. ते अंत्यत निकृष्ट दर्जाचे असून केवळ मोठमोठे दगडच रस्त्यावर टाकून ठेवण्यात आले आहे. मागास भागातील मुलांना क्रीडा क्षेत्रात नैपूण्य प्राप्त व्हावे, आपणसुद्धा कुठेच कमी नाही, ही भावना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी राज्यशासनाने ही कल्याणकारी योजना कार्यान्वित केली. परंतु अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ सुरु आहे. राजुरा शहरात अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी ‘रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही’ या भ्रष्ट तत्वावरच सुरू आहे. सर्व ठेके कमिशनवरच दिल्या जात असल्याची शक्यता येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. शासनाच्या योजना येतात, त्या योजना सुरु होतात आणि मध्येच कुठेतरी बंद पडतात. त्यामुळे या योजनांचे दिवाळे निघते.तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाच्या पूर्णत्वाला एवढी वर्षे लागण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संकुल पूर्ण झाले नसले तरी संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे. अगोेदर संकुल पूर्ण करुन संरक्षण भिंत बांधायला हवी होती. ती भिंतसुद्धा निकृष्ट असल्याचे बोलल्या जात असून भिंतीचे बांधकामसुद्धा अर्धेच झाले आहे. मार्चअखेरपर्यंत पैसा खर्च करा, आणि शासनाच्या निधीची विल्हेवाट लावा असाच गोरखधंदा सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)
४० लाखांचे क्रीडा संकुल पाच वर्षांपासून धूळ खात
By admin | Published: July 16, 2014 12:07 AM