बल्लारपूर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त बल्लारपूर तालुका कृषी विभागाचे वतीने येथील ग्रामपंचायत समिती सभागृहात आयोजित रानभाज्या महोत्सवात एकूण ४० प्रकारच्या वन तसेच शेती भाज्या प्रदर्शन तसेच विक्रीकरिता ठेवण्यात आल्या आहेत.
सोमवारी उद्घाटन झालेला हे महोत्सव सात दिवस चालणार आहे. रानभाज्या तसेच शेताच्या बांधावर उत्पादित भाज्यांची गुणात्मक माहिती लोकांना व्हावी, त्यांनी ती विकत घ्यावी या उद्देशाने आयोजित या महोत्सवात मसाला पान, गोपीन, अळू, केना, भोई, आवळा, काटवेल, गुडवेल, तट्टू शेंगा आणि फुले इत्यादी पौष्टिक तसेच औषधींयुक्त भाज्या तालुक्यातील कोठारी, आसेगाव, आमडी, विसापूर, इटोली, मानोरा, कवडजई या गावांतील शेतकऱ्यांनी आणल्या आहेत. कोठारी येथील राधिका महिला स्वयंसहायता समूहाने ही यात स्टॉल लावला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती इंदिरा रमेश पिपरे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार संजय राईनचवार, उपसभापती सोमेश्वर पद्मगिरवार, संवर्ग विकास अधिकारी किरण कुमार धनवडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, प्रगतशील शेतकरी प्रभाकर गडकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, संचालन कृषी सहायक घनश्याम टाले यांनी केले.