कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ४१३ केंद्रे तयार केली. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही ४० पेक्षा जास्त केंद्रे सुरू आहेत. मात्र, पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना कालावधी पूर्ण होऊनही लस मिळत नसल्याने शहरातील केंद्रांवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. लस घेण्यासाठी केंद्रासमोर युवक-युवतीही गर्दी करीत आहेत. पण, काही उपयोग नसल्याचे पाहून घरी परत जात आहेत. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील केंद्रांत आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ५५ हजार ५३८ जणांचे लसीकरण झाले. अनेकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्रे बंद राहतात. प्रत्येक केंद्राला ८० ते १०० डोस मिळत आहेत. त्यामुळे ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना लस मिळणे कठीण झाले.
कुपन घेऊनही अनेकांचा हिरमोड
आरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी दहा वाजता लसीकरणाला सुरुवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी चंद्रपूर मनपाने कुपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढे डोस आले तेवढीच कुपन आधी वितरण केली जातात. नागरिक पहिल्यांदा कुपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात लस किती उपलब्ध आहे, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जात नाही. पण, कुपन वाटणे सुरूच असते. त्यामुळे केंद्रात १०० लस उपलब्ध असताना २०० ते २५० नागरिक केवळ कुपनसाठी रांग लागतात. कुपन घेऊनही लस मिळत नाही, अशी चंद्रपुरातील स्थिती आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मन:स्ताप
६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी उपलब्ध डोसनुसार चंद्रपूर मनपा क्षेत्रात तीन किंवा चार केंद्रे सुरू असतात. त्यातही आता १८ ते ४४ गटासाठीच तीन केंद्रे सुरू आहेत. परंतु, जास्त डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना निराश होऊन घरी परत जावे लागते. १८ वर्षांवरील तरूणाईसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. पण, एकाही केंद्रावर १०० पेक्षा जास्त डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे युवक-युवतींचा हिरमोड होत आहे. ऑनलाईन नोंदणी करूनही लसीकरणासाठी चकरा माराव्या लागतात.
लस वितरण करताना आरोग्य विभागाची त्रेधातिरपीट
दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्याला केवळ ८ हजार डोस मिळाले होते. त्यामुळे केंद्रांना डोस वितरण करताना
जिल्हा परिषद आरोग्य विभागाची त्रेधातिरपीट उडाली होती. विभागीय आरोग्य संचालक कार्यालयातून किती डोस मिळणार याची जिल्हा आरोग्य यंत्रणेला काहीच माहिती नसते. लसीकरण सुरू झाल्यापासून ही समस्या कायम आहे. मागील आठवड्यात २२ हजार ५०० डोस मिळाल्याने सर्वच केंद्रांवरून लसीकरण सुरू झाले. गुरुवारी डोस संपल्याने ही केंद्रे पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहेत.
कोट
तीन दिवसांपासून केंद्रात जात आहे. लस कोणत्या केंद्रावर उपलब्ध आहे, याची माहिती मिळायला सकाळी नऊ वाजतात. माहिती घेऊन संबंधित केंद्रावर गेल्यास आधीच कुपन घेण्यासाठी मोठी रांग दिसून येते. त्यामुळे मला पहिला डोस घेता आला नाही. कुटुंबातील आणखी दोन सदस्य लसीकरणापासून वंचित आहेत.
-श्रीकांत चापले, बालाजी बार्ड, चंद्रपूर
कोट
बाबूपेठ येथील केंद्रात मी पहिला डोस घेतला. दुसरा डोस घेण्यासाठी तीन दिवसांपासून चकरा मारत आहे. कुपन घेऊनही लस मिळाली नाही. त्यामुळे केंद्रातून घरी परत आले. हा प्रकार चार दिवसांपासून घडत आहे. ही समस्या सोडविली पाहिजे.
-स्मिता गाडे, बाबूपेठ, चंद्रपूर