सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या सास्ती कोळसा खाणीत चोरांचा धुमाकूळ सुरू असून येथील कर्मचाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवून चोरट्यांनी पीसी मशीनमधील ४० हजार रुपयांचे डिझेल चोरून नेल्याची घटना मंगळवारी घडली.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येत असलेल्या विविध कोळसा खाणीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. येथील केबल, लोखंडी सामान, डिझेलसह मशीनच्या सुट्या भागांची चोरी केल्या जात आहे. परंतु मंगळवारी घडलेली घटना भयभीत करणारी आहे. चक्क पीसी मशीनच्या चालकाला वेकोलिच्या कार्यक्षेत्रातच तलवारीचा धाक दाखवीत डिझेल चोरून नेल्यामुळे वेकोलिची सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या भागातील पोलीस यंत्रणेवरही प्रश्न निर्माण केला जात आहे.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे टाटा सुमो या चारचाकी गाडीने कोळसा उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी आले. पीसी मशीनच्या चालकाला तलवारीचा धाक दाखवित मशीनमधील ४० हजार रुपयांचे डिझेल बाहेर काढले व चोरून नेले. घटनेची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरू आहे.